तरुणांनो सावधान ! ब्यू व्हेल सुसाईड गेम घेतोय जीव

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक,  ता. ३१ : पालकांसाठी आणि इंटरनेटच्या आहारी गेलेल्या तरुणांनासाठी हा सावधतेचा इशारा.

व्हीके सोशल नेटवर्कींग साईटच्या माध्यमातून सध्या जगभर ब्ल्यू व्हेल सुसाईड गेमचे गारूड पसरत असून हा गेम मुलांना थेट आत्महत्येला उद्युक्त करत असल्याचे सिद्ध झाले आहे.‍

जगभरात या गेमच्या विरोधात मोहीम सुरू असून पालक आणि विद्यार्थ्यांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.

शनिवारी मुंबईतील मनप्रीत सिंग या १४ वर्षीय मुलाने ७ मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने आपल्या मित्रांना आपण या गेमच्या संपर्कात आल्याचे म्हटले होते.

ब्लू व्हेल सुसाईड गेम हा एक ऑनलाईन ग्रूप चालवतो. या ग्रूपच्या माध्यमातून सहभागी होणाऱ्यांना वेगवेगळी धोकादायक आव्हाने करायला सांगितले जातात.

त्यामध्ये हाताची शीर कापणे, हातापायात खिळे ठोकणे, पूलाच्या मधोमध किंवा रेल्वेमार्गाच्या मधोमध उभे राहणे, वेळी अवेळी केव्हाही उठणे, हॉरर फिल्म पाहणे इत्यादी अगदी अमानवीय भासणाऱ्या गोष्टी सांगितल्या जातात.

एकूण ५० दिवसांच्या या गेममध्ये शेवटी आत्महत्या करायला सांगितले जाते किंवा जीवाला धोका होईल अशा पद्धतीने उंचावरून उडी मारणे वगैरे गोष्टी करायला सांगितल्या जातात.

स्वाभाविकपणे अगदी तरुण मुले, वयोगट १४ ते १९ वर्षांची मुले या प्रकाराला बळी पडतात. इतकेच नाही, एकदा या गेमचे सदस्य झाले आणि त्यात सहभागी झाले, तर हा गेम मध्येच सोडता येत नाही. तसेच  तो अनइन्स्टॉल किंवा डिलिट करता येत नाही.

सायबर बुलींग प्रमाणेच यावर सहभागी होणाऱ्या किशोरवयीन मुलांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आघात केले जातात. त्यांना धमक्या दिल्या जातात. त्यांचा ऑनलाईन छळ  केला जातो आणि शेवटी त्यांना मृत्यूला कवटाळण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यामुळे अशा गेम्सपासून किंवा सोशल नेटवर्कपासून दूर राहणेच हिताचे.

व्हीके अर्थातच व्हीकॉन्टॅक्टे या रशियन सोशल नेटवर्कींग वेबसाईटवर हा मरणाच्या दारात घेऊन जाणारा इंटरनेट गेम आहे.

ब्ल्यु व्हेल सुसाईड चॅलेंज या इंटरनेट गेममुळे आतापर्यंत शेजारील पाकिस्तानसह जगभरातील ३०० हून जास्त मुलांनी आत्महत्या केल्या आहेत.

व्हीके सोशल नेटवर्कची सुरुवात रशियात २०१३ मध्ये झाली. मानसशास्त्राचा अभ्यासक असलेल्या फिलीप बुडेकीन याने या सुसाईड गेमची कल्पना प्रत्यक्षात आणली. मानसशास्त्रीय फंडे वापरून मुलांवर किंवा तरुणांवर दबाव टाकायचा आणि त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करायचे ही त्यांची कार्यपद्ध्‌ती आहे. मात्र रशियात आत्महत्या झाल्यानंतर तेथील बुडाकिन याला ताब्यात घेऊन खटला भरण्यात आला. त्याच्यावर १६ मुलींच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

त्याने सांगितलेली माहिती अतिशय धक्कादायक होती. लोकांना मारण्यासाठीच हा गेम त्याने सुरू केला. त्याच्यामते समाजातील भार कमी करण्याच्या दृष्टीने मी लोकांना आत्महत्येला प्रवृत्त करतो. तसेच हे जे लोक सुसाईड गेममध्ये सूचना ऐकून तसेच करतात आणि मृत्यूला कवटाळतात, ते त्याच्यादृष्टीने जैविक कचरा असल्याचे त्याने सांगितले.

यावरूनच या ग्रूपची विकृत मानसिकता पुढे येत असून त्यापासून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. मुंबईतील आत्महत्येवरून हा गेम आता भारतातही दाखल झाल्याचे उघड झाले आहे.

तुम्हाला त्रास झाला असेल तर असे करा उपाय

जे कोणी या गेमच्या संपर्कात आले असतील आणि त्यांना धमक्या येत असतील, ब्लॅकमेलिंग केले जात असेल त्या मुलांनी किंवा तरुणांनी न घाबरता संबंधितांना नकार द्यावा.

2. तसेच त्यांनी ऐकले नाही, आपल्या पालकांच्या माध्यमातून सायबर पोलिसांत तक्रार नोंदवावी.

3. संबंधित ॲप किंवा गेम डिलिट होत नाही तोवर आपल्या मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपवरील इंटरनेट कनेक्शन बंद ठेवावे.

4. सोशल मीडिया किंवा इंटरनेटच्या आहारी न जाता आपले मित्र, पालक, कुटुंबिय यांच्याशी प्रत्यक्ष संवादावर भर द्यावा.

5. पालकांनीही आपल्या मुलांना सोशल मीडिया आणि इंटरनेटपासून शक्यतो दूरच ठेवावे. आपला पाल्य नेमके काय पाहतो यावर नियंत्रण ठेवावे.

6.मुलांची चीडचीड होणे, मुलांचा स्वभाव आक्रमक होणे किंवा एकदम मुले अबोल किंवा उदास होत असतील, तर तातडीने त्यांच्याशी संवाद साधावा. तसेच वेळ पडल्यास बालमानसशातज्ज्ञाचाही सल्ला घ्यावा. मुलाचे वेळीच समुपदेशन केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

 

 

 

 

LEAVE A REPLY

*