बेस्ट संपाचा सलग सातवा दिवस

0
मुंबई : बेस्ट संपाचा आज सातवा दिवस असून मुंबईकरांचे मात्र अतोनात हाल होत आहेत. पालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. या प्रकरणी आज न्यायालयातही सुनावणी होणार आहे. पण संपावर आज तोडगा निघाला नाही तर ‘तमाशा’ करणार, असा इशारा मनसेने दिला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीबरोबर चर्चा झाल्यानंतरही लेखी आश्वासन मिळेपर्यंत बेस्ट कामगार संघटना माघार घेण्यास तयार नाहीत. आज मुंबई उच्च न्यायालयात संपासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी असल्यानं तोवर राज्य सरकार कोणता निर्णय घेतं, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

बेस्ट कामगार कृती समिती, बेस्ट प्रशासन आणि राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीची दुसरी फेरीही सोमवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातव्या दिवशी तरी बेस्टच्या कामगारांचा संप मिटेल का, याकडे मुंबईकरांच्या नजरा लागल्या आहेत.

बेस्टचे कर्मचारी राज ठाकरेंच्या भेटीला

बेस्ट संपावर तोडगा निघत नसल्याने कर्माचरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती. या भेटीत बेस्ट कुटुंबीयांनी राज ठाकरेंसमोर आपल्या समस्या मांडल्या. आता आमच्या पद्धतीने समस्या सोडवू, असं आश्वासन यावेळी राज ठाकरे यांनी बेस्ट कुटुंबीयांना दिलं होतं.

आता मनसे स्टाईल

आता बेस्ट संपावर आज तोडगा निघाला नाही तर मनसे प्रत्यक्ष संपात उतरणार आहे. यामुळे मुंबईतील रस्त्यांवर जो काही तमाशा होईल यासाठी प्रशासन आणि सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. यामुळे बेस्ट संप आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय आहेत मागण्या

कामगारांचा वेतन करार, कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे आदी विविध मागण्यांसाठी गेल्या सोमवारी मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बेस्टचे जवळपास ३० हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

*