Thursday, May 2, 2024
Homeनगरखंडपीठाची शासनाला कारणे दाखवा नोटीस

खंडपीठाची शासनाला कारणे दाखवा नोटीस

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य केंद्रातील डॉ. गणेश शेळके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून दिनांक 6 जुलै 2021 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर त्यांच्या नातेवाईकांची तक्रार दाखल करून घेण्यास पाथर्डी पोलीसांनी टाळाटाळ केल्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढत शासनास कारणे दाखवा नोटीस बजवाली आहे.

- Advertisement -

याबाबत सोमवारी (दि.18) औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही एम देशपांडे व न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे या न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली त्यामध्ये औरंगाबाद खंडपीठाने महाराष्ट्र सरकार व संबंधित यंत्रनांनी डॉक्टर शेळके यांच्या नातेवाईकाच्या सांगण्याप्रमाणे फिर्याद लिहून का घेतली नाही यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

डॉ. शेळके यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या नातेवाईकांनी डॉ. शेळके यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे आहेत त्या संबंधितांवर पाथर्डी पोलिसात फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस प्रशासनाने फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली म्हणून डॉ. शेळके यांच्या पत्नी हर्षदा गणेश शेळके यांनी उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. आपल्या पतीच्या आत्महत्येस कारणीभूत असणार्‍या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी यासाठी अ‍ॅड. एन. बी. नरवडे यांच्या वतीने न्यायालयात दाद मागितली. यावर सोमवारी सुनावनी झाली. यात न्यायालयाने ताशेरे ओढत शासनास नेाटीस बजावली आहे.

डॉ. शेळके यांनी दिनांक 6 जुलै 2021 रोजी करंजी उपकेंद्रात ड्युटीवर असताना गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी डॉ शेळके यांनी तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार व कलेक्टर या वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड लिहून ठेवली होती. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे यांना तीन महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. याबाबत नातेवाईकांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात सुसाईड नोटमध्ये नावे असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत फिर्याद दिली.

मात्र ती घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर काही दिवसाच डॉक्टर दराडे पुन्हा तालुक्यातच सेवेत हजर झाल्यामुळे हे प्रकरण वरिष्ठ पातळीवरून दडपण्यात आले की काय? अशी देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. परंतु डॉक्टर शेळके यांच्या पत्नी हर्षदा शेळके यांनी थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आपल्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या व्यक्तींविरोधात न्याय मागितल्याने या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकार्‍यांवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

डॉ.शेळके यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी या प्रमुख मागणीसाठी गृहमंत्री, आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन मागणी केली. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्याच वेळेस कारवाई करणे अपेक्षित होते शेवटी हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्याने आतातरी संबंधितांवर तात्काळ योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.

– संभाजीराजे दहातोंडे, प्रदेशाध्यक्ष मराठा महासंघ

- Advertisment -

ताज्या बातम्या