Friday, May 3, 2024
Homeनगरबेलवंडी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराची आत्महत्या

बेलवंडी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराची आत्महत्या

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

जिल्हा पोलीस दलातील पोलीस हवालदार भाऊसाहेब दगडू आघाव यांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच दसर्‍याच्या दिवशीच बेलवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहायक फौजदार सुनील धोंडिबा मोरे (54) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मोरे यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी त्रास दिल्याने हवालदार आघाव यांनी पाच दिवसांपूर्वी बंदूकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल आहे. ही घटना ताजी असताना फौजदार मोरे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येमागेही वरिष्ठांचा जाच असल्याची चर्चा पोलीस दलात आहे.

फौजदार मोरे हे श्रीगोंदे शहरातील महाराजा जिवाजीराव शिंदे कॉलेजच्याजवळ परिवारासह राहात होते. ते एक ते दीड महिन्यांपासून मेडिकल रजेवर असल्याचे समजले. बेलवंडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या त्रासाला कंटाळून सुनील यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांची पत्नी किर्ती मोरे यांनी केला आहे.

दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याचा शोध पोलीस घेत आहे. फौजदार मोरे यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, श्रीगोंदे पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयत मोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदे ग्रामीण रूग्णालयात पाठविला. ऐन सणासुदीच्या दिवशी पोलीस अंमलदाराने आत्महत्या केल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

बेलवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक फौजदार सुनील मोरे यांनी आत्महत्या केली. या बाबत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मयताचे नातेवाईक सध्या दुःखात आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे काय निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई करू.

– अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या