बेलापूरच्या ग्रामसभेत गोंधळ

0
बेलापुर(वार्ताहर) – बेलापुर बुद्रुक येथील ग्रामपंचायतींची ग्रामसभा अभूतपूर्व तीन तास प्रचंड आरडाओरड, हमरीतुमरी, माईकची हिसका हिसकी, पोलिसांचा वारंवार हस्तक्षेप आरोप प्रत्यारोप, खुलासे-प्रतिखुलासे अशा गरमागरम वातावरणात सरपंच भरत साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली.
या सभेत यापूर्वी ग्रामसभेने केलेल्या नगरपंचायतीच्या ठरावानुसार नगरपंचायत करण्यासाठी सुरू असलेला शासकीय पातळीवरील पाठपुरावा यापुढेही सुरू ठेऊन नगरपंचायत करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्याआधी यावरील चर्चेत जि.प.सदस्य शरद नवले यांनी नगरपंचायतीस पुन्हा विरोध

दर्शविला आणि स्वतंत्र व्यापक ग्रामसभा घेण्याची मागणी केली. मात्र याआधी अनेकदा हा ठराव ग्रामसभेत मंजूर झालेला असल्याने नंतर आज पुन्हा हात वर करुन आणि आवाजी संख्याबळावर हा ठराव मंजूर झाला. त्याची सूचना ऐनतपुर सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत नाईक यांनी मांडली त्यास पं.स.चे माजी उपसभापती दत्ता कुर्‍हे यांनी अनुमोदन दिले. त्यावर सरपंच भरत साळुंके यांनी समर्पक युक्तिवाद केला.

प्रारंभी तंटा मुक्तीचे अध्यक्ष सुधाकर खंडागळे यांनी आणि नंतर गोविंद वाबळे यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर ग्रामरोजगार, ग्रामविद्युत सेवक, पाणी टंचाई, रेशन ग्राहकांच्या तक्रारी, अंत्योदय लाभार्थी यादी, शेती प्लॉटवर बांधकाम केलेल्याना आलेल्या वसुलीच्या नोटिसा, मका खरेदी केंद्र सुरू करणे आदी विषयावर चर्चा, वारंवार होणार्‍या खुलासे-प्रतिखुलाशाने सभा चांगलीच रंगली.

पाणी प्रश्नावर जि.प.सदस्य शरद नवले यांनी गावची 4 कोटी 17 लाखांची मंजूर योजना राजकिय श्रेय मिळणार नाही म्हणून बारगळविली असा आरोप सरपंच साळुंके यांनी केला. त्यावर हे आरोप बिनबुडाचे असून ते सिद्ध करा असा खुलासा करून सत्ताधारी विरोधकांना टार्गेट करीत असल्याचा आरोप केला. तर याबाबत ठोस पुरावे देण्याची तयारी सुधीर नवले यांनी दर्शविली.

यावेळी पंचायत समिती सदस्य अरुण नाईक, उपसरपंच शिरीन शेख, ग्रामविकास अधिकारी लांडे, तलाठी परते उपस्थित होते. सदस्य रविंद्र खटोड, विवेक वाबळे, बाजार समिती संचालक सुधीर नवले, अशोक कारखाना संचालक अभिषेक खंडागळे, जालिंदर कुर्‍हे, प्रभाकर कुर्‍हे, राजेश खटोड, ज्ञानेश्वर कुलथे, रमेश अमोलिक, यादव काळे, सौ. नंदा पवार, देविदास देसाई आदींनी विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला. रामगड येथील आदिवासीं संस्थेच्या धान्य दुकानातील ग्राहकांच्या तक्रारीचा मुद्दा चांगलाच वादग्रस्त ठरला.

धान्य दुकानदार राज्य शाखेच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल देविदास देसाई यांचा ग्रामसभेत सत्कार करण्यात आला. पं.स.सदस्य अरुण नाईक यांनी आभार मानले. अपेक्षेप्रमाणे ही ग्रामसभा वादळी होईल. त्यामुळे नेहमीपेक्षा मोठ्या संख्येने ग्रामस्थांची तसेच पोलिसांची उपस्थिती होती. सभा संपल्यावर काही बाचाबाची झाल्याने शहर पोलीस ठाण्यातून आलेल्या अधिकार्‍यांच्या ताफ्याने हस्तक्षेप केल्याने वादावर पडदा पडला.

  माजी सरपंच सौ. ज्योती भांड, जावेद शेख यांनी सरपंच भरत साळुंके यांच्या विरुद्ध अवमानकारक पत्रके वर्तमानपत्रात छापून आणल्याबद्दल शरद नवले यांचा नामोल्लेख टाळून निषेध व्यक्त केला. त्यावर शरद नवले यांनी खुलासा देण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर उपस्थितांचे समाधान झाले नाही. यासंबंधी आणि बेताल आरोपांबाबत सरपंच साळुंके व सुधीर नवले यांनी आक्रमक पवित्रा घेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

 

LEAVE A REPLY

*