Type to search

Featured सार्वमत

बेलापूर मंडलाच्या दुष्काळी निधीची शासनाने मागविली आकडेवारी

Share

करण ससाणेंच्या पाठपुराव्याला यश । शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील बेलापूर मंडलामधील दुष्काळी निधीची आकडेवारी शासनाने मागविली आहे. त्यामुळे बेलापूर मंडलामधील शेतकर्‍यांना दुष्काळनिधी मिळेल, अशी अपेक्षा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी व्यक्त करून आमच्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगितले. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर मंडलाबरोबरच इतर तीन मंडल दुष्काळग्रस्त जाहीर करुन त्वरित भरपाई मिळावी यासाठी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी ज्येष्ठ नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. सदर भेटीदरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर मंडल हे दुष्काळग्रस्त जाहीर झाले असून परंतु अद्यापपावेतो कोणताही दुष्काळनिधी या मंडलामधील शेतकर्‍यांना मिळाला नव्हता.

ही वस्तुस्थिती मंत्रिमहोदयांच्या निदर्शनास आणल्यानंतर ना. चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला त्वरित आदेश देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने बेलापूर मंडलामधील दुष्काळग्रस्त निधी वितरीत करण्यासाठी राज्य शासनाने तहसीलदार श्रीरामपूर यांना दुष्काळनिधीसाठी आवश्यक असणारी रकमेची आकडेवारी मागविली आहे.

तालुक्यातील बेलापूर मंडलामध्ये दुष्काळ जाहीर होऊन देखील अद्यापपावेतो कोणताही दुष्काळ निधी संबंधीत शेतकर्‍यांना मिळाला नाही. त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या वीज बिलाचा प्रश्‍न, विद्यार्थ्यांच्या फी सवलतीचा प्रश्‍न यावर मदतीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते. मात्र शासनाने बेलापूर मंडलामधील दुष्काळनिधीच्या रकमेची माहिती मागविल्याने पुन्हा एकदा शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

त्याअनुषंगाने करण ससाणे यांनी श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत पाठपुरावा केला. यावेळी तहसीलदार पाटील यांनी शासनाने बेलापूर सर्कलमधील दुष्काळग्रस्तांसाठी लागणार्‍या निधीच्या रक्कमेची माहिती राज्य शासनाने मागविली असल्याचे सांगितले. सदरचा लागणारा दुष्काळनिधीची माहिती त्वरित राज्य शासनाला कळविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

बेलापूर सर्कलमधील शेतकर्‍यांनी आपल्या भागातील तलाठ्यांकडे दिलेल्या बँक खात्याचे खातेक्रमांक तपासून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करुन ठेवावी, असेही करण ससाणे यांनी सांगितले. दरम्यान तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या भेटी प्रसंगी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन गुजर, सुरेश कवडे, अनिल देशमुख, संजय कवडे उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!