बेलापूर पुलाचा पाया उघडा पडल्याने तातडीने दुरुस्ती करावी

0

ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

बेलापूर (वार्ताहर)- महाड घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी बेलापूर बुद्रुक येथील प्रवरा नदीवरील पुलाचा पाया उघडा पडल्याने पुलास धोका निर्माण झाला असून, राष्ट्रीय आपत्तीकालीन निधीतून विशेष बाब म्हणून या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी बेलापूर (बन), उक्कलगाव, आंबी, केसापूर, दवणगाव, संक्रापूर, गळनिंब, कडीत, मांडवे, चांदेगाव, करजगाव आदी गावांतील ग्रामस्थांसह प्रवरा नदी, बंधारे, बचाव कृती समिती, ग्रामस्थांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बेलापूर येथील प्रवरा नदीवर बांधण्यात आलेला पूल गेल्या 55 वर्षांपासून वाहतुकीस खुला आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून जड वाहने गेली म्हणजे पुलास मोठे हादरे बसतात. ही बाब महाड येथील घटनेच्यावेळी दि. 6 ऑगस्ट 2016 रोजी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिल्यानंतर तत्कालीन उपविभागीय अभियंता सा. बां. विभाग श्री. गायकवाड यांनी सद्यस्थितीचा अहवाल अधीक्षक अभियंत्यांना दिल्याचे सांगून पुलास धोका नसल्याचे म्हटले. मात्र कोल्हार येथील प्रवरा नदीवरील पुलास भगदाड पडल्याने त्या पुलारील वाहतूक वळवून ती वाहतूक बेलापूर येथील नदीवरील पुलावरून होत असल्याने पुलास मोठमोठे हादरे बसण्याचे प्रमाण वाढले आहे.

वास्तविक वरवरच्या पाहणीनुसार अहवाल दिले जात आहेत. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल देणे गरजेचे आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सर्वच बाबींची बारीक तपासणी होईल. त्यातून त्यांचे आयुष्यमान समोर येईल. मात्र बांधकाम विभाग ही तसदी घेत नसल्याचे निवेदनात स्पष्ट म्हटले आहे. या निवेदनावर प्रवरा नदी बंधारे बचाव कृती समितीचे सचिव विष्णूपंत डावरे, वसंतराव कोळसे, नानासाहेब पवार, माणिकराव महाडिक, भानुदास गाडे, रवींद्र गोरे, दादासाहेब मेहेत्रे, शरद नवले, भरत साळुंके, पुरुषोत्तम भराटे, राम पोळ, अरुण नाईक, शिवाजी वाबळे, प्रफुल्ल डावरे, अभिषेक खंडागळे, सुवालाल, राकेश कुंभकर्ण, लुक्कड, दिलीप काळे, महेश व्यास, दादासाहेब जाधव, सुरेश कुर्‍हे, सुमित बोरुडे, जालिंदर कुर्‍हे आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

*