Thursday, April 25, 2024
HomeनाशिकBlog : ‘बेगमी’ अर्थात आपत्ती व्यवस्थापन

Blog : ‘बेगमी’ अर्थात आपत्ती व्यवस्थापन

“अगं काल काय डोसे , आज काय पावभाजी ?
काय चाललंय काय ? ”
अगं Actully ना घरातली कणिक संपलीय आणि दळून आणायला वेळ नाही . आणि विकतचा आटा खूपच जाड असतो ,म्हणून …..
” काय हे तुम्हा आजकालच्या मुलींचं, जरा घरात लक्ष नाही. थोडं असतानाच दळून आणायचं, महिन्या दोन महिन्याचं सामान तर घरात ठेवाल की नाही? अचानक कोणी आलं तर काय कराल ” ? इति आमच्या मातोश्री ….

“काही नाही ग , मिळतं सगळं हल्ली बाजारात “.
इति मी ……

- Advertisement -

आज हा संवाद आठवायचं कारण म्हणजे, आज आलेली परिस्थिती. आज खरोखर आईच्या त्या सल्ल्याच महत्त्व पटतंय. 22 तारखेला जनता curfew, आणि 23 पासून लॉक डाउन. स्वप्नातही वाटलं नव्हतं आपल्यावर अशी पारस्थिती येईल, जीवनावश्यक गोष्टी साठी देखील बाहेर जायची भीती वाटेल.

पण या घोषणेनंतर लोकांच्या बाजारात, किराणा दुकानात लागलेल्या रांगा, आणि उडालेली गर्दी पाहिली आणि धडकीच भरली .
या सगळ्यांनी किमान आपल्या आई आज्जीचा सल्ला ऐकला असता तर यांच्यावर अशी वेळ नसती आली .
सगळ्यांना आठवत असेल आपलं लहानपण.

तेव्हा घरातील स्त्रिया उन्हाळ्याच्या दिवसात वर्ष , दोन वर्ष पुरतील एवढे बेगमीचे पदार्थ करून ठेवायच्या . एकतर गरिबी , आणि बाहेर काही खाद्यपदार्थ विकत घेण्याची फॅशन तेव्हा आलेली नव्हती त्यामुळे वर्षभरात अचानक घरात काही कार्य निघाले , पै पाहुणे आले तर घराचे बजेट बिघडायला नको म्हणून ही तजवीज असायची.

त्यामुळे गरिबीतही संसार सुखाने नांदत . शिवाय उन्हाळ्यानंतर चार महिने कुठे बाहेर पडता नाही आलं , भाज्या महाग असल्या तरी काही अडायच नाही. चैत्र सुरू व्हायच्या आधी सांडगे तोडून या वाळवणाच्या पदार्थांची सुरुवात व्हायची.

मग उडदाच्या पापडाची लाटी फोडायची . घरात लग्नाचं कुणी असेल तर हे तर अत्यावश्यक , कारण लग्न कधीही ठरो घर तयार असायचं , त्यावेळी काही आजच्यासारखं लग्नाचं काँट्रॅक्ट द्यायची पद्धत नव्हती. त्यानंतर नागलीची खिशी घ्यायची, कुरडयांचा घाट घ्यायचा.

हे काम मात्र एखादीच सुगरण करायची , मग तिला प्रत्येक घरी घाट घ्यायला जावं लागायचं . बाकी सगळ्या कुरडया पाडायला आणि पोरसोर राखण करायला. मोठं टीम वर्क च असायचं ते. नंतर मग बटाटा पापड, बटाटा चिप्स, साबुदाण्याच्या पापड्या, चकल्या, असे उपवासाचे पदार्थ वर्षभरा साठी करून ठेवायचे म्हणजे मग श्रावणात आणि पुढे येणाऱ्या सगळ्या उपवासात ते कामी यायचे.

याबरोबरच तांदुळाच्या पापड्या , ज्वारीच्या पापड्या , बिबड्या काय नी काय घरातले फळीवरचे डबे या पदार्थांनी भरून ठेवले की वर्षभर चिंता नसायची. एवढेच नाही तर काळा मसाला , गोडा मसाला , लाल तिखट , हळद , धने जिरे पूड सगळं घरीच करून स्वच्छ बरण्या भरल्या जायच्या. आजकाल आम्ही आणतो मॉल मधल्या पुड्या त्याला ना रंग ना चव.

वर्षाचे गहू, तांदूळ, डाळी साळी घेऊन ऊन देऊन स्वच्छ करून कोठ्या भरल्या जायच्या म्हणजे पुढे अन्न धान्याचे भाव कितीही वाढो चिंता नाही. या दिवसात कांदा स्वस्त मिळायचा, मग तो बारीक चिरून वाळवून ठेवायचा म्हणजे पुढे कांदयाच्या भावाने डोळ्यात पाणी आणलं तरी नो टेन्शन.

चिंच वाळवून ठेवायची, आमसूल खारवून ठेवायचे . मग नंतर आंब्याचं लोणचं , मुरंबा , साखरंबा , गूळआंबा यांच्या बरण्या भरायच्या . बाहेरचे जॅम जेली सॉस माहीतच नव्हते . माझी आजी तर दर महिन्याला आणलेल्या पदार्थातून वाटी वाटी वेगळ्या डब्यात काढून ठेवायची त्यावर तिने अनेक सणवार वेगळा खर्च न करता निभावून नेलेत , अस आई सांगते .

हे तर झालं खाण्यापिण्याचे , पण जास्तीचे अंथरून पांघरून , जास्तीच्या ताट वाट्या भांडी कुंडी यांचीही बेगमी बायका करायच्या . पै पै जोडून घरात पैसा साठवून ठेवायच्या . घरात काही अडचण आली तर काढून द्यायच्या.

आज आपण वेळ नाही या नावाखाली या सगळ्या गोष्टी विसरलो . सगळं काही विकत मिळेल म्हणून गाफील राहिलो . वर्ष तर जाऊच द्या महिनाभर पुरेल एवढी ही बेगमी आपण केली नाही , म्हणून आज आपल्यावर अशी धावाधाव करायची वेळ आली . खरंतर वेळ नाही , या कारणापेक्षा एवढे कष्ट कोण घेणार हाच खरा मुद्दा आहे.

आजची पिढी तर आपल्याही पुढे , 20 रुपयांची भेळ खायलाही paytm करणारी मुलं पहिली की हसावं की रडावं ते कळत नाही . एखाद्या आडगावात यांचं कार्ड किंवा paytm चाललं नाही तर काय करतील हे ? थोडे तरी रोख पैसे घरात , खिशात ठेवत चला हे कसं सांगणार यांना .
पण काहीही असो , कोणी काही म्हणो या बेगमी करण्याच्या चांगल्या सवयीवर आपल्या आधीच्या पिढ्यांनी अनेक संकट परतवून लावली .
आपण मात्र यावरून काहीच धडा घेतला नाही त्यामुळे आलेल्या परिस्थितीत आपण हवालदिल झालो . बेगमी म्हणजे वस्तूंचा अवाजवी साठा नाही, परंतु निदान अचानक काही अडचण आली तर वेळ निभावून नेता आली पाहिजे एवढी तयारी तर प्रत्येकाने करायलाच हवी . आज अजून भर पडलीये ऑनलाइन शॉपिंग ची, अन्न सुद्धा आपण ऑनलाइन मागवू लागलोय , त्यामुळे फक्त तात्पुरता विचार करण्याची सवय जडत चाललीय.

अगदी पुढच्या सात पिढ्यांची बसून खाण्याची व्यवस्था नाही पण किमान आपल्या आयुष्यभरात तरी आपल्याला निश्चिंतपणे राहता येईल एवढी बेगमी तरी प्रत्येकाने करायलाच हवी.

आता कळतंय जुन ते सर्वच टाकाऊ नसत , ते करीत असलेल्या प्रत्येक कृतीत काहीतरी विचार होता . या कोरोनाच्या संकटान आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या
त्यातलीच ही एक .

तनुजा सुरेश मुळे ( मानकर ), नाशिक .

- Advertisment -

ताज्या बातम्या