संगमनेरात 3400 किलो गोमांस हस्तगत

0
संगमनेर (तालुका प्रतिनिधी) – राज्यात गोवंश जनावरांची हत्याबंदी असतानाही संंगमनेरात जनावरांची सर्रास कत्तल सुरू आहेे. शहरातील रहेमतनगर व भारतनगर येथील कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकत 3400 किलो गोमांसासह चार वाहने पकडली. ही कारवाई बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास झाली. या कारवाईत पोलिसांनी एकूण आठ लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरातील रहेमतनगर याठिकाणी असणार्‍या शाहीद हाफीज शेख याने गोवंश जनावरांची कत्तल करून टेम्पो (एमएच-48-एजी-6324), महिन्द्रा टेम्पो (एमएच-23-6823) व टाटा एस छोटा टेम्पो नंबर नसलेला या तिन्ही वाहनांमधून गोमांस घेऊन जात असल्याची माहिती गुप्त खबर्‍यामार्फत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना समजली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल इस्माईल शेख, पोलीस नाईक विजय पवार, पोलीस नाईक गोरक्ष शेरकर, पोलीस नाईक रमेश लबडे, सागर धुमाळ, अजय आठरे यांच्या पथकाने त्या ठिकाणी बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात अडीच लाख रुपयांचे दोन हजार 500 किलो गोमांस व चार लाख 25 हजार रुपयांची चार वाहने असा एकूण सहा लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
तर दुसर्‍या कारवाईमध्ये वरील शाहीद शेख याचे भारतनगर येथून एमएच-17-एजी-0540 या टेम्पोमधून 90 हजार रुपये किंमतीचे 900 किलो गोमांस दुसर्‍या ठिकाणी जात असतांना पोलिस नाईक श्री.देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल सुनिल ढाकणे, साईनाथ वर्पे व प्रमोद गाडेकर यांनी सदर टॅम्पोचा पाठलाग करत हा टॅम्पो भारतनगर याच ठिकाणी पकडला. या दोन्ही कारवाईमध्ये एकूण 8 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विजय पवार व प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी शाहिद हाफिज शेख, सलीम ख्वाजा शेख (दोघे रा.रहेमतनगर, संगमनेर) व चार अज्ञात वाहन चालकांविरुद्ध गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*