बीडच्या मतदारांचा नगरमध्ये राडा

0

बस न मिळाल्याने पहाटे पुणे स्टँडवर गोंधळ

अहमदनगर (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्थलांतरित झालेले बीडकर तेथील मतदानासाठी नगर, पुण्याहून चालले होते. मात्र, त्यांना नगरमध्ये पहाटे बस मिळाली नाही. मतदान चुकेल आणि आपली पार्टी पडेल या भीतीने त्यांच्या काळजात धडकी भरली.
या रागातून त्यांनी येथील पुणे बस स्थानकावर भलताच राडा घातला. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे मतदारांना बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तेव्हा कुठे हे जागरूक मतदार गावाकडे गेले.
बीड जिल्ह्याला प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे व भीमराव धोंडे यांच्या राजकीय वर्चस्वामुळे मोठा वादात्मक इतिहास लाभला आहे. मात्र, याच जिल्ह्यातील बहुतांशी नागरिक शिक्षण व नोकरीसाठी परगावी वास्तव्य करतात.
राज्यात कोठेही काम करणारा बीडचा कर्मचारी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकीच्या निवडणुकीसाठी हमखास गावाकडे येतो.
सध्या पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे, तसेच भगवानगडाचा वाद अशा अनेक युद्धांमुळे बीड नेहमीच चर्चेत राहिले आहे. पंकजा मुंडेे यांची सावरगाव येथे नुकतीच सभा पार पडली. तेथे त्यांनी ग्रामपंचायतमध्ये आपल्याला कौल देण्याची मागणी केली. काल राज्यात बहुतांशी ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झाले. त्यामुळे बीडमधून बाहेर पडलेल्या नागरिकांनी गावाकडे धाव घेतली.
शनिवारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पुणे बस स्थानकावर बीडला जाण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. बीडकडे जाणार्‍या बस पुणे बस स्थानकावर येण्याच्या आधीच भरून येत होत्या. त्यामुळे बसमध्ये उभे राहण्यासाठी देखील जागा होत नव्हती.
अडीच तासाच्या प्रतीक्षेनंतर बीड प्रवाशांचा संयम सुटला व त्यांनी बस व्यवस्थापनाला घेराव घातला. पुणे बस स्थानकावर एकच गदारोळ सुरू झाला. बस व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
संतापलेले प्रवासी डेपो मॅनेजरला मारहाण करण्याच्या बेतात होते.
त्यामुळे परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी रात्री 3 वाजता कोतवाली पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांनी बळाचा वापर करीत प्रवाशांना खाकीचे बळ दाखवले. एसटीच्या व्यवस्थापनाशी बोलून जादा गाडी सोडण्यात आली. त्यामुळे वातावरण निवळले, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक कल्पना शिरदावडे यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*