बीड : बहुतांश ग्रामपंचायतींवर माजी मंत्री सोळंके यांचे वर्चस्व

0
बीड- तालुक्यातील 44 पैकी 40 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत मतमोजणी झाली. चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींवर माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचे वर्चस्व कायम राहिले असून मतदारांनी भाजपचे आमदार आर. टी. देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून मोहन जगताप यांनी स्थापन केलेल्या जनविकास आघाडीलाही कौल मिळाला.
तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरासरी 86 टक्के मतदान झाले होते. राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या सादोळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पंचायत समिती उपसभापती सुशिल सोळंके यांच्या आई कमलबाई विजयकुमार सोळंके या विजयी झाल्या असून ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात माजी मंत्री प्रकाश सोळंकेंनी यश मिळविले आहे.
सादोळा ग्रामपंचायत निवडणूक अटी तटीची होऊन त्यात राष्रवादी काँग्रेसच्या कमलबाई विजयकुमार सोळंके निवडून आल्या आहेत तर भाजपच्या भाग्यश्री रमेश सोळंके यांचा निसटता पराभव झाला.
तालुक्यातील सादोळा, खरात आडगाव, नाकले पिंपळगाव, नागडगाव, गोविंदपूर, वाघोरा या ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या तर शृंगारवाडी, एकदरा, धनगरवाडी, शहाजानपूर या चार ग्रामपंचायती छत्रपती कारखाना उपाध्यक्ष मोहन जगताप यांच्या ताब्यात तर आमदार देशमुख यांच्या ताब्यात पुनदगाव, रेणापुरी, सुरूमगाव, रोषणपुरी,
शुक्लतिर्थ लिमगांव, राजेवाडी, ब्रम्हगाव, गोविंदवाडी, देवखेडा, डेपेगाव, लहामेवाडी, मनुरवाडी या ग्रामपंचायती आल्या आहेत. दरम्यान तालुक्यात मतदारांनी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांना कौल दिला असला तरी विद्यमान आमदार आर. टी. देशमुख, मोहन जगताप यांनी अनेक गावांत आपले खाते उघडले आहे.

पुतण्याची सरशी – बीडमधील नवगण राजुरी येथील प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार जयदत्त क्षीरसागर यांना पुतणे संदीप क्षीरसागर यांनी धोबीपछाड दिला. संदीप क्षीरसागर यांच्या गटाने सरपंचपदासोबत सदस्य संख्येतही बाजी मारत दणदणीत विजय संपादन केला. त्यामुळे आमदार क्षीरसागरांना ‘होमग्राउंंड’वरच मोठा धक्का बसला.

पांगरीत धनंजय मुंडेंची बाजी – पंकजा मुंडे यांचं वर्चस्व असलेली पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या पॅनलने जिंकली आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडेंचा असा सामना रंगला आहे. यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना हरवलं होतं. 

LEAVE A REPLY

*