सुगंधित तांदूळ खाणाऱ्यांनो सावधान! सुगंध येण्यासाठी मिसळली जातेय रासायनिक पावडर

0

घोटी | प्रत्येकाच्या आहारातील अविभाज्य घटक असलेल्या भातामध्ये आता सुगंधी भात बाजारात येत असल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. अनेकजण भात खरेदी करताना सुगंध घेऊनच भाताची परखणी करतात. पण आता भाताला वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक पावडर टाकून सुगंध दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. 

उच्चभ्रू कुटुंबे बासमती सारखे महागडा तांदूळ आहारात वापरतात. तर मध्यमवर्गीय कुटुंबे तांदळाची खरेदी करतात. बासमती तांदळाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांना पर्याय म्हणून सुगंधित तांदळाची इंद्रायणी हे संकरीत वानाची लागवड अलीकडे मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

त्यानंतर या तांदळाला मोठी मागणी सर्वच ठिकाणाहून वाढली आहे. गरिबाची बासमती म्हणून ओळख असणार्‍या या तांदळाने अल्पावधीत घराघरात प्रवेश केला. परंतु अलीकडच्या काळात घोटी सारख्या तांदळाच्या मोठ्या बाजारपेठेत साध्या व हलक्या प्रतीच्या तांदळात सुगंधाची रासायनिक पावडर भेसळ करून इंद्रायणी तांदळाच्या नावाखाली विकून ग्राहकाची फसवणूक करण्याचे प्रकार सर्रासपणे होत असल्याचे उघड झाले आहे.

ही पावडर घातक नसल्याचा दावा तांदूळ उत्पादक करीत असले तरी इंद्रायणीच्या नावाखाली तांदळाची विक्री करून फसवणुकीचा प्रकार गेली अनेक वर्षापासून बिनधास्तपणे चालू आहे. या बाबीकडे अन्न आणि औषध प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे.

सर्वाधिक भाताचे आगार असलेल्या इगतपुरी तालुक्यात भातापासून तांदूळ निर्मितीसाठी भात मिला घोटी या मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. इगतपुरी तालुक्यातील शेतकर्‍याचा जास्त उत्पादन असणार्‍या संकरीत भात बियाणाच्या लागवडीकडे अधिक कल असतो.

अशातच प्रती बासमती समजल्या जाणार्‍या इंद्रायणी नामक वाण दहा वर्षापूर्वी तालुक्यात दाखल झाले. प्रचंड सुगंध व भरघोस उत्पन्न यामुळे या तांदळाला सर्व ठिकाणाहून मागणी वाढली. यामुळे तालुक्यातील या पिकाचे लागवड क्षेत्रही वाढले.

गेली दोन वर्षाच्या कालखंडात इगतपुरी तालुक्यात होणारा बेमोसमी पाऊस अतिवृष्टी यामुळे पिकावर आलेले भातपिके वाया जात असल्याने या भाताचे उत्पादन कमी झाले आहे.

उत्पादन कमी झाले असले तरी मागणी मात्र तीच असल्याने घोटीतील तांदूळ उत्पादकांनी कृत्रिम इंद्रायणी तांदूळ निर्मितीचा नवीन फंडा शोधला असून,कोणत्याही साध्या व हलक्या प्रतीच्या तांदळात सुगंधित रासायनिक पावडरची भेसळ करून हा तांदूळ इंद्रायणी म्हणून विकला जात आहे.

गेली अनेक वर्षापासून घोटी शहरातील अनेक भाताच्या गिरण्यात हा प्रकार सर्रासपणे चालू असताना या बाबीकडे मात्र अन्न आणि औषध प्रशासन लक्ष घालीत नसल्याने सुगंधित तांदूळ वेड्या ग्राहकाची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे.

दरम्यान, दिल्ली भागातील नोयडा येथील औद्योगिक वसाहतीत या पावडरची निर्मिती केली जाते. ही पावडर तांदळाच्या एका मोठ्या ढिगात एकजीव केली जाते व हा कृत्रिम सुगंधित तांदूळ विक्रीसाठी बाहेर पाठविला जातो.

या पावडर घातक नसल्याचे मत तांदूळ उत्पादकांनी व्यक्त केले असून,याबाबतची अन्न आणि औषध प्रशासनाची मंजुरी असल्याचे त्यांनी व्यक्त केले. तर याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी अज्ञाभिन्न असल्याचे दिसते.

कसा ओळखाल कृत्रिम सुगंधित तांदूळ : या तांदळात पावडर भेसळ केली जात असल्याने हा तांदूळ पाण्यात घातल्यास अथवा धुवून काढल्यास तांदळाचा सुगंध निघून जातो. तसेच उन्हात वाळत घातल्यासही काही तासातच तांदळाचा सुगंध नष्ट होतो.

LEAVE A REPLY

*