8 नोव्हेंबरला नोटबंदीचे वर्षश्राद्ध : शेतकरी सुकाणू समितीची माहिती

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला दि 08 नोव्हेंबरला 1 वर्ष पुर्ण होत असून नोटबंदीच्या हुकूमशाही निर्णयाचा निषेध करण्यासाठी राज्य सुकाणू समिती दि. 08 नोव्हेंबर रोजी राज्यभर नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालून करणार आहे. अशी माहिती शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख बाळासाहेब पटारे यांनी दिली आहे.
500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातुन बाद करुन लादलेल्या निर्णयाची सर्वाधिक झळ शेतकर्‍यांना बसली. शेतमाल विक्री व्यवस्था कोलमडून आधिच मेटाकुटीस आलेल्या शेतकर्‍यांच्या सर्वच मालाचे भाव कोसळून शेतकरी लुटला गेला आहे. आजही शेतकरी या आर्थिक आरिष्ठातुन सावरला गेला नाही.
नोटबंदीचा निर्णय घेताना सरकारकडून चलनातील खोटया नोटा बाद होतील, अवैध मार्गाने कमविलेला काळा पैसा गोठला जाईल, अतिरेकी कारवायांना पायबंद बसेल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात असे काहीही घडलेले नसून उलट सरकार पक्षातील पुढार्‍यांनी नोटबंदीच्या निर्णयाचा पुरेपुर फायदा उठवत स्वत:चे उखळ पांढरे करुन घेतले.
सर्वसामान्य व शेतकरी मात्र या निर्णयाने भरडला गेला. केंद्रशासनाच्या नोटबंदीच्या हुकूमशाही निर्णयाचा निषेध करण्यासाठी राज्य सुकाणू समिती दिनांक 8 नोव्हेंबर रोजी राज्यभर नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालून निषेध करणार आहे. या पार्श्वभूमिवर अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाज प्रबोधनकार अजय महाराज बारस्कर यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
तरी जिल्हा सुकाणू समितीतील सर्व समविचारी संघटना व शेतकर्‍यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख बाळासाहेब पटारे, जिल्हा कार्याध्यक्ष अहमदभाई जहागिरदार, जिल्हाध्यक्ष अशोकराव पठारे, शेतकरी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बच्चु मोढवे, जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव जवरे व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*