बँक अधिकारी असल्याचे भासवून सुशिक्षांताना गंडा घालण्याचा प्रयत्न फसला

0

फसव्या कॉलपासून सावधानता बाळगा

अहमदनगर – एका सुशिक्षित दांम्पत्याला बँक अधिकारी असल्याचा दूरध्वनी करून त्यांच्याकडून एटीएमकार्डची माहिती घेऊन पैसे काढण्याचा प्रकार नेवासा तालुक्यात घडला. ही बाब त्या सुशिक्षित दांम्पत्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती संबंधित बँकेला दिल्यानंतर पैसे वर्ग होण्याची प्रक्रिया थांबली. त्यामुळे त्यांचे होणारे आर्थिक नुकसान टळले.

गेल्या काही दिवसांपासून अनेकांना असे दूरध्वनी येत आहे. आम्ही बँकेतून बोलत आहोत, आपल्या खात्याचे आधारलिंक केले का? असे म्हणून संबंधित बोलण्यास सुरुवात करतात. त्यानंतर सावज गळाला अडकला असे लक्षात आल्यानंतर संबंधित लोकांकडून त्यांचे एटीएमचे नंबर व त्याचे पासवर्ड विचारून घेऊन त्यावरील पैसे काढून घेत आहे. असे प्रकार जिल्ह्यात काही ठिकाणी घडत आहे. काहीजण फसवणूक होऊनही आपली बदनामी नको म्हणून पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी करण्याचे टाळत आहेत. त्यामुळे या महाठकांचे फावत आहे.

बँक अधिकारी बोलतो, असे सांगून नेवासा शहरातील एका सुशिक्षित दांम्पत्याच्या नावावर असलेल्या बँक खात्याची माहिती विचारली. संबंधित घरातील महिला कामाच्या गडबडीत असल्यामुळे आलेल्या दूरध्वनीवरून माहिती देण्यास सुरुवात केली. कामाच्या व्यापात त्यांनी नको, असलेली माहिती संबंधिताला दिली.

त्यानंतर काही वेळाने काम आटोपल्यानंतर आपण संबंधिताला जी माहिती दिली, त्यावरून आपल्या खात्यातील पैसे काढले जाऊ शकतात, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती घरातील व्यक्तींना दिली. त्यानंतर संबंधित बँकेत दूरध्वनी करून झालेला प्रकार कथन केला. त्यानंतर बँक अधिकार्‍यांनी खात्यावरून वर्ग होणार्‍या पैशांची प्रक्रिया थांबवली.

बँकेतून परस्पर पैसे काढणार्‍या लुटारूंनी माहिती विचारून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यात फसले. त्यांना बँक खात्यात किती पैसे आहेत, याचा अंदाज आला नाही. त्यांनी जास्त रक्कम टाकल्याने पैसे त्यांना आपल्या खात्यात वर्ग करता आले नाही. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. गेल्या काही दिवसांपासून असे प्रकार होत आहे. त्यामुळे ही टोळी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नागरिकांनी आपल्या खात्याची माहिती देऊ नये –
कोणतीही बँक दूरध्वनीवर ग्राहकाला कसलीच माहिती विचारत नाही. त्यामुळे नागरिकांनी असे कॉल आल्यानंतर आपल्या खात्याची माहिती देऊ नये. आपण कितीही कामात असलो तरी आलेल्या कॉलची माहिती घेऊनच त्यावर सर्व माहिती द्यावी, अन्यथा फसगत होण्याची शक्यता आहे, असे एका बँकेच्या अधिकार्‍याने सांगितले.

नंबर जातात कसे –
नेवासा तालुक्यातील काहींना तुम्हाला बक्षीस लागलेले आहे. त्याचा टॅक्स भरावा लागले, असे सांगून गंडावण्याचा प्रकार घडलेला आहे. त्यानंतर आता बँक खात्याची माहिती घेऊन त्यातून पैसे काढण्याचा प्रकार सुरु आहे. या लोकांकडे सर्वसामान्य लोकांचे नंबर मोबाईल नंबर जातात कसे असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

माहिती न दिल्यास संबंधितांकडून होतेय शिविगाळ –   नेवासा तालुक्यात बँक खात्याची माहिती विचारण्यासाठी अनेकांना कॉल आलेले आहेत. काहींनी संबंधितांची उलटतपासणी सुरु केल्यानंतर संबंधितांकडून नागरिकांना शिविगाळ केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी ज्या दूरध्वनीवरून कॉल आला त्यावर अनेकदा कॉल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर कॉल लागत नसल्याने अनेकांना नाईलाज झालेला आहे. या फेक कॉलची तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई होईलच याची खात्री नसल्याने अनेकांनी तक्रार करण्याचे टाळले आहे.

LEAVE A REPLY

*