Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

नगर: 16 कोटींच्या कर्जाचा लफडा!

Share

‘उद्योगी’ डॉक्टरची करामत । भाजपचे ‘साहेब’ गुताड्यात । पोलीसात तक्रार

अहमदनगर (प्रतिनिधी) – हॉस्पिटलची टोलेजंग बिल्डिंग अन् अत्याधुनिक मशिनरी खरेदीसाठी डॉक्टर समूहातील एका ‘उद्योगी’ डॉक्टरने बँकेच्या चेअरमन साहेबांना हाताशी धरून 16 कोटी रुपये लाटल्याचा प्रकार समोर येऊ पाहत आहे. ज्या बँकेतून कर्जाचा ‘उद्योग’ केला गेला ती बँक भाजप नेत्याशी संबंधित असल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बड्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे चेअरमन साहेब अन् संचालक मंडळाविरोधात पोलीसात तक्रार दाखल झाल्याची माहिती हाती आली आहे.

शहरात मोठ्ठे हॉस्पिटल उभारून त्यात अत्याधुनिक मशीनरी खरेदीसाठी डॉक्टरांच्या समुहाने बँकेकडे कर्ज प्रकरणाची फाईल केली. भाजपचे ‘साहेब’ चेअरमन असल्याने त्यांनी संचालकांच्या बैठकीत 16 कोटीचे कर्ज मंजूर केले. अनेक डॉक्टरांच्या नावे उचललेल्या कर्जाचा पैसा प्रत्यक्षात एकाच उद्योगी डॉक्टरने वापरला. त्यासाठी अन्य डॉक्टरांच्या नावे कर्ज मंजूर झालेल्या बँकेत बनावट खाते ओपन करून त्यावर ट्रन्झाक्शन दाखविण्यात आले आहे. अन्य डॉक्टरांना त्याची माहितीच नव्हती. बँक प्रशासनाने कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठविल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर या डॉक्टरांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार अर्ज दिला अन् गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे हे डॉक्टर थेट एसपींच्या भेटीला पोहचले. आज बुधवारी एसपींकडेही तक्रार अर्ज देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राजकीय उट्ट्याचा संशय
अशाच प्रकारच्या कर्जामुळे अगोदरच एक बँक अन् तिचे संचालक मंडळ अडचणीत सापडले आहेत. आता आणखी एका बँकेतील कर्जाचे लफडे समोर आल्याने अन् तेही भाजप नेत्याच्या संबंधित बँकेचे नाव समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामागे काही राजकीय धागेदोरे असण्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. तक्रारदाराचे स्नेही अन् ज्याविरोधात तक्रार आलीय ते सगळेच भाजपशी निगडीत असल्याने या चर्चेला उधान आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!