न्यूझीलंडमधल्या दोन मशिदींमध्ये गोळीबार, 40 जणांचा मृत्यू

0
वेलिंग्टन: न्यूझीलंडच्या साऊथ आयलँडवरील ख्राइस्ट चर्च शहरात आज सकाळी दोन मशिदींमध्ये अज्ञात इसमाने बेछूट गोळीबार केला आहे. या हल्ल्यात ४० जण ठार, तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या बांग्लादेशी संघाला मात्र सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

ख्राइस्टचर्चमधील अल नूर मशिदीत हा गोळीबार सुरू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. शुक्रवारच्या नमाजसाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव या मशिदीत येत असतात. त्यामुळे मशिदीत गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत काळे कपडे आणि हेल्मेट घालून एक अज्ञात इसम अल नूर मशिदीत शिरला. कोणालाही कळायच्या आत त्याने बेछूट गोळीबार सुरू केला. न्यूझीलंड पोलिसांनी 4 जणांना ताब्यात असून, त्यात 1 महिला तर 3 पुरुषांचा समावेश आहे.

मशिदींशेजारील परिसरही रिकामी करण्यात आला. न्यूझीलंडचे पंतप्रधान जॅसिंड आर्डन यांनी हा देशाच्या इतिहासातला काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. तसेच लोकांनी सुरक्षित जागी राहावे, असंही त्यांनी स्थानिक नागरिकांना आवाहन केलं आहे.

क्रिकेट संघाचे खेळाडू बचावले

न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू थोडक्यात बचावले आहेत. बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते जलाल युनिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडू बसमध्ये होते आणि मशिदीत जाण्याची तयारी करत असतानाच गोळीबार झाला.

 

LEAVE A REPLY

*