Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

रँटेडाईनचा समावेश असणाऱ्या पित्तनाशक गोळ्यांवर बंदी

Share

नाशिक । अजित देसाई

रँटेडाईन या औषधाचा समावेश असलेल्या ऍसिलॉक, झेंटॅक, रॅन्टॅक यासारख्या पित्तावरील गोळ्यांमध्ये कॅन्सरला पोषक असणाऱ्या घटकांची मात्रा आढळून आल्याने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने त्यांची विक्री व वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या एफडीए आयुक्त पल्लवी दराडे यांनी यासंबंधीचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.

राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या औषध खरेदी कक्षाने एफडीएच्या सूचनेनुसार आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र लिहून सरकारी रुग्णालयांमधून रँटेडाईन चा समावेश असणाऱ्या पित्तनाशक गोळ्या व इंजेक्शनचे वितरण तात्काळ थांबवण्यास सांगितले आहे.

याशिवाय एफडीएने या औषधाचा समावेश असणाऱ्या सर्वच पित्तनाशक गोळ्यांची पुढील आदेशापर्यंत विक्री न करण्याचे निर्देश औषधविक्रेत्यांना दिले आहेत. नॅशनल ड्रग्स कंट्रोलर जनरल यांच्याकडील पत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र एफडीएने रँटेडाईनचा समावेश असणाऱ्या औषधांवर ही बंदी लादली आहे. इतर देशांकडून प्राप्त अहवालानुसार रँटेडाईन औषधांमध्ये एन- नायट्रोसोडिअम मेथॅलॅमाइन (एनडीएमए) कमी प्रमाणात आढळून आले आहे. मात्र इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरसी) च्या मानकानुसार एनडीएमए हा घटक मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून तो कॅन्सरसाठी पोषक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या संपूर्ण देशात रँटेडाईन विविध उपचारांसाठी वापरण्यात येत असून ते गोळ्या व इंजेक्शन या रूपात उपलब्ध आहे. त्याशिवाय रँटेडाईन हे शेड्युल एच या प्रकारात मोडत असून नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांकडून लिहून दिल्यानंतरच त्याची विक्री करण्याचे नियम आहेत, असे असताना आपल्याकडे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय मोठ्या प्रमाणात ऍसिलॉक, झेंटॅक, रॅन्टॅक यासारख्या पित्तावरील गोळ्यांची विक्री करण्यात येते. मात्र एफडीएच्या आदेशाने या गोळ्यांचे सततचे सेवन कॅन्सरला निमंत्रण देणारे असल्याने त्यांच्या विक्रीवरच बंदी घालण्यात आली आहे. एफडीएने संपूर्ण राज्यात रँटेडाईनच्या उत्पादकांकडील कच्चा माल व इतर आवश्यक बाबींची तपासणी सुरु केली आहे.

शेड्यूल एच हा भारतातील प्रिस्क्रिप्शन ड्रग्जचा एक वर्ग आहे जो ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स नियम 45 मध्ये परिशिष्ट म्हणून दिसतो. ही अशी औषधे आहेत जी एका योग्य डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय काउंटरवर खरेदी करता येत नाहीत. सर्व औषधांचे उत्पादन आणि विक्री ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अ‍ॅक्ट अँड नियमांतर्गत येते. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेचा भाग असलेल्या ड्रग्स टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी बोर्डाच्या सल्ल्यानुसार काही वेळा हे सुधारित केले जाते. सर्वात अलीकडील शेड्यूल एच (2006) मध्ये रँटेडाईनसह 536 औषधांची यादी आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!