Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedइंटरनेटनेही साथ सोडली तर..?

इंटरनेटनेही साथ सोडली तर..?

एकांतवासाच्या या काळात इंटरनेट हा आपला एकमेव सांगाती आहे. परंतु ज्याप्रमाणे पाण्याचा एकेक थेंब वाचविणे आवश्यक बनले आहे, तसेच एकेक एमबी डेटा वाचविणे ही आजची गरज आहे. इंटरनेटचा अधिक आणि विनाकारण वापर झाल्यास इंटरनेट पुरविणार्‍या यंत्रणेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि हा आपला एकमेव सांगातीही आपला हात सोडू शकतो. आजच्या बिकट अवस्थेत सरकारी कामे, संसर्गाचा मुकाबला आणि वर्क फ्रॉम होम, हे सर्व काही इंटरनेटवर अवलंबून असल्यामुळे इंटरनेटचा गरजेपुरता आणि माहितीपुरता वापर करणेच हितावह ठरणार आहे.

बालेंदु शर्मा दधिच, तंत्रज्ञानतज्ज्ञ

‘कोविड-19 अर्थात करोना विषाणूंचा फैलाव होण्याच्या धास्तीने बहुतांश जग आज घरात बंदिस्त आहे. अशा स्थितीत इंटरनेट हा आपल्या सर्वांसाठी प्राणवायू ठरला आहे. लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या (भेटीगाठी टाळणे) कालावधीत इंटरनेटविना सर्वसामान्यांचे जगणे कसे असेल, याची कल्पना करणेही कुणालाही आज शक्य नाही. आज आपल्या हाती गतिमान इंटरनेट नसते तर मनोरंजनापासून एकमेकांशी संवाद साधण्यापर्यंत तसेच माहिती मिळविण्यापासून कार्यालयीन कामकाज पूर्ण करेपर्यंत आपण कोणतेही काम करू शकलो नसतो. आज कोट्यवधी लोक आपापल्या कार्यालयात जाऊ शकत नाहीत; पण घरबसल्या काम करून ते आपली जबाबदारी पूर्ण करू शकत आहेत. इंटरनेट आपले पोट भरू शकत नसले, तरी आपल्यासाठी ते एका अर्थाने अन्नच बनले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

परंतु त्यातही एक धोका आहे. आपण सर्वजण आपापल्या स्मार्टफोनचा आणि संगणकाचा अतिरिक्त वापर करीत राहिलो तर त्यामुळे कदाचित इंटरनेटवर आणि त्यासाठीच्या तांत्रिक संरचनेवर अतिरिक्त ताणही येऊ शकतो. वाढती मागणी पूर्ण करण्यात इंटरनेट यंत्रणा अपुरी पडू लागली तर काय होईल? किंवा आपल्या चॅटिंगमुळे आणि व्हिडिओ-ऑडिओ शेअर करण्यामुळे अतिरिक्त बँडविड्थ खर्ची पडून अत्यंत गरजेची सरकारी कामे आणि उपचारांसाठी मदत करण्यास इंटरनेटवर आधारित असलेल्या यंत्रणांना अधिक कनेक्टिव्हिटी मिळणार नाही, असेही होऊ शकते.

- Advertisement -

ज्या लोकांना येत असलेल्या संकटाच्या गांभीर्याची कल्पना आहे किंवा त्याचा अंदाज जे लावू शकत आहेत, ते अर्थातच चिंतेत आहेत. भारताच्या सेल्युलर ऑपरेटर असोसिएशनने दूरसंचार मंत्रालयाला पत्र लिहून कळविले आहे की, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि ओव्हर दि टॉप ऍप्सचे संचालन करणार्या कंपन्यांना असे निर्देश दिले जावेत, की त्यांनी त्यांच्या स्ट्रीमिंगचे रिझोल्यूशन कमी करावे. जेणेकरून इंटरनेटवर जास्त ताण येणार नाही. देशभरातील लोकांना कमी रिझोल्यूशन असलेले व्हिडिओ अथवा चित्रपट पाहण्यास सांगण्यात आले, तर कदाचित इतक्या झटपट प्रभाव दिसून येणार नाही. परंतु जर बाजारपेठेवर प्रभुत्व असलेल्या मोजक्या कंपन्यांनी आपल्या स्तरावर असा निर्णय घेतला, तर बँडविड्थचा वापर कमी केला जाऊ शकेल. ज्या गोष्टींमुळे अतिरिक्त बँडविड्थ खर्ची पडते, अशा गोष्टीच सध्या इंटरनेटद्वारे जास्तीत जास्त प्रमाणात शेअर केल्या जात आहेत. उदाहरणार्थ, व्हिडिओ कॉल, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी अ‍ॅॅप्सवरील चित्रपट आणि कार्यक्रम, यू-ट्यूबवरील व्हिडिओ, टीम्स, झूम आणि स्लॅक आदी वर्क फ्रॉम होमची आयुधे, आदी. विद्यार्थ्यांचे वर्गही ऑनलाइन झाले आहेत. जिम आणि योगाचे मार्गदर्शनही ऑनलाइन दिले जात आहे. या सर्व धावपळीत जी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपले इंटरनेट आणि आपला डेटा प्लॅन!

सध्या इंटरनेटचा भरभरून वापर करीत असलेल्यांना कदाचित ही बाब खोटी किंवा गमतीचीही वाटू शकेल; परंतु इंटरनेटचा जेव्हा अतिरिक्त वापर होतो तेव्हा मोठमोठी इंटरनेट स्टेशन बंद पडतात, अशा बातम्या सर्वांनीच कधी ना कधी वाचल्या असतील. हीच गोष्ट संपूर्ण इंटरनेटच्या बाबतीत अगदीच अशक्य आहे का? हा प्रश्न सध्याच्या काळात प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. विचार करण्याजोगी गोष्ट अशी की, सामान्य स्थितीत जेवढा इंटरनेटचा वापर होतो, त्यापेक्षा सध्याच्या काळात डेटा डाउनलोडचे प्रमाण कितीतरी पटींनी वाढले आहे. हा वापर कमीत कमी दीडपट अधिक आत्ताच झालेला आहे, ही गोष्ट कुणीही लगेच मान्य करू शकेल. परंतु इंटरनेट सेवेसाठीच्या सध्याच्या पायाभूत सुविधांना त्यांची म्हणून एक मर्यादा आहे, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आता प्रश्न असा की, आपण त्या मर्यादेच्या जवळपास पोहोचलो आहोत का? आणि आपण ती सीमा ओलांडून पुढे जाण्याची शक्यता आहे का? त्याहून अधिक महत्त्वाचा सवाल असा की, अशी वेळ आलीच तर इंटरनेटची आपल्याकडील संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडू शकते का? आणि करोनाच्या संकटाबरोबरच आपले जग दूरसंचार आणि माहितीच्या मोठ्या संकटाला सामोरे जाऊ शकते का?

ही शंका गृहित धरूनच युरोपीय महासंघाने काही दिवसांपूर्वी व्हिडिओ शेअरिंग करणार्‍या वेबसाइट्स आणि प्लॅटफार्म्सना विनंती केली आहे की, त्यांनी हाय डेफीनेशन व्हिडिओ शेअर करणे थांबवावे. गरजेचे नसेल तेव्हा एचडी क्वालिटीच्या व्हिडिओचे स्ट्रीमिंग करू नये, असा आग्रह महासंघाने केला आहे. प्रचंड मागणीमुळे आपल्या सेवेवर परिणाम होऊ लागला असल्याची कबुली फेसबुकनेही दिली आहे. सद्यःस्थितीत भारतात प्रतिव्यक्ती 10.7 गीगाबाइट एवढा डाटा दरमहा वापरला जात आहे. आगामी महिनाभरात हा वापर कमीत कमी दीडपट वाढू शकतो. वेगाने वाढणारी मागणी पूर्ण करू शकेल आणि सध्याच्या वेगाने नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी पुरवू शकेल, एवढी आपल्या देशातील इंटरनेट पुरवठा यंत्रणा सक्षम नाही.

मोबाइल कॉल ड्रॉपची समस्या सर्वांनीच अनुभवली आहे. वर्षानुवर्षे प्रयत्न करूनसुद्धा ही समस्या सुटलेली नाही. याबाबत सरकारकडून मोबाइल सेवाप्रदात्या कंपन्यांना अनेकदा तंबी देण्यात येऊनसुद्धा ही समस्या जशीच्या तशी आहे. हीच परिस्थिती इंटरनेट सेवांच्या बाबतीत उद्भवू शकते आणि तातडीने यासंबंधी योग्य ती पावले उचलली गेली नाहीत तर घरात बंदिस्त असलेल्या लोकांना दिवस ढकलणे अवघड होऊन बसेल. घरून कार्यालयीन काम करणेही मुश्किल होईल. अत्यावश्यक सेवा पुरविणे आणि संसर्गावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांवरही नकारात्मक प्रभाव पडू शकेल, हे वेळीच लक्षात घेतलेले बरे.

युरोपीय महासंघाने जे आवाहन केले आहे, त्याला योग्य प्रतिसाद देताना व्हिडिओ स्ट्रीमिंग करणार्‍या तसेच ओव्हर दि टॉप म्हणजे ओटीटी म्हणविल्या जाणार्या वेबसाइट्सनी आणि ऍप्सनी आपल्या व्हिडिओ स्ट्रीमिंगची क्वालिटी कमी करण्यास प्रारंभ केला आहे. व्हिडिओ कंटेन्ट देणार्‍या कंपन्यांनी उचललेली ही पावले महत्त्वपूर्ण आहेत. अधिक क्वालिटी असलेला व्हिडिओ डाउनलोड करण्यास किंवा पाहण्यास अधिक डेटा खर्ची पडतो, ही गोष्ट तर आपणा सर्वांना ठाऊक आहेच. कमी क्वालिटीच्या व्हिडिओबाबत मात्र याच्या उलट स्थिती असते.

नेटफ्लिक्सने अशी घोषणा केली आहे की, कंपनी आगामी महिनाभर आपल्या सर्व व्हिडिओचे बिट रेट कमी करेल. यूट्यूब, अमेझॉन आणि अ‍ॅॅपलनेही आपापल्या प्लॅटफॉर्मवरून प्रसारित केल्या जाणार्या व्हिडिओ स्ट्रीमिंगची क्वालिटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खरोखर खूप मोठा फरक पडणे अपेक्षित आहे.

मात्र, अशा बिकट परिस्थितीत आपणसुद्धा आपली जबाबदारी ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. आपणही आपला डेटा अत्यंत काटकसरीने वापरला पाहिजे. असे केल्यास आपण इंटरनेटची सुविधा अनंत काळपर्यंत वापरत राहू शकू. पाण्याचे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत कमी कमी होऊ लागले, तेव्हा जी गोष्ट पाण्याबद्दल बोलली जाऊ लागली, तीच आपण आज इंटरनेटबद्दल समजून घ्यायला हवी. ज्याप्रमाणे पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा असून, तो वाचविणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे इंटरनेटचा एकेक एमबी डेटा वाचवायला हवा. त्याचा दुरुपयोग होणार नाही किंवा अनुत्पादक कामांसाठी अधिक डेटा खर्च होणार नाही, याची काळजी तुम्ही-आम्ही घेतली पाहिजे. अन्यथा एकान्तवासाच्या या अवस्थेत जर इंटरनेटने आपला हात सोडला, तर आपल्यातील अनेकांना अक्षरशः वेड लागेल, हे आपण सगळेच जाणतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या