Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कार्यकर्त्यांच्या मनात ‘महाशिवआघाडी’चे वातावरण

Share

प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे सूचक विधान || स्थानिक पातळीवर भाजपला घेरण्याचे संकेत

संगमनेर (प्रतिनिधी) – राज्यातील काही महापालिकांमध्ये संभाव्य महाशिवआघाडीतील मित्रपक्ष एकमेकांना मदतीसाठी सरसावले आहेत. याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी सूचक विधान केले आहे. ‘आम्ही तर अशा काही सूचना दिल्या नाहीत. परंतु कार्यकर्त्यांमध्येच तसे वातावरण मला दिसत आहे. स्थानिक पातळीवरही भाजपला दूर ठेवण्यासाठी तसं होऊ शकते, असे वाटते,’ असे ते म्हणाले. यावरून आगामी काळात राज्यात महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला घेरण्याचे हे संकेत मानले जात आहेत.

शनिवारी संगमनेर येथे माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी राज्य सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरु असतांना राज्यात काही महानगर पालिकांत महापौर पदाची निवड होत आहे. तेथे महाशिवआघाडी एकत्र येणार का, या प्रश्नावर त्यांनी हे विधान केले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सत्तास्थापना ते अवकाळी पावसाने ग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीबाबत आपली भुमिका मांडली.

17 तारखे पर्यंत सरकार स्थापन होवू शकणार नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार स्पष्ट केले होते. या संदर्भात बोलताना आ.थोरात म्हणाले, तिन पक्षांना सरकार एकत्रित येवून स्थापन करायचे असल्यास ते विचाराने आणि व्यवस्थीत केले पाहिजे, असा शरद पवार यांचा विचार आहे. पाच वर्ष सरकार चालवायचे असल्याने त्यातील काही बारकावे समजून घेतले पाहिजे. काही गोष्टी स्पष्ट असल्या पाहिजे. जो समान कार्यक्रम तयार करायचा, तो उत्तम झाला पाहिजे. काही शंका न ठेवता एकत्रितपणे पुढे गेले पाहिजे. त्या अनुषंगाने अपेक्षीत वाटचाल सुरू आहे. दिल्लीमध्ये काही बैठका होतील अशी अपेक्षा आहे. कदाचित चार दिवस जास्त जातील, पण जे होईल ते ठोस आणि विश्वासपूर्ण होईल.

शिवसेनेशी काँग्रेस नेत्यांच्या चर्चेवरून हायकमांड नाराज आहेत का? या प्रश्नावर ते म्हणाले, या बातम्या कुठून आल्या हे माहित नाही. आम्ही एकत्र बसतो आहोत. त्या सदिच्छा भेटी आहेत. सरकार एकत्र करायचे असल्यास मन आणि विचार जुळले पाहिजे. त्यासाठी या भेटी आहेत. त्यातील तपशीलावर दिल्लीतील बैठकीत चर्चा होईल. राज्यातील शेतकरी, कारखानदार, शेती, शिक्षण, आरोग्य, रस्ते या विषयांवर एकत्रित मंथन या बैठकांतून झाले. राज्यघटनेचा आम्ही आदर करतो. त्यामुळे सत्ता स्थापनेबाबत तिनही पक्षांचे नेते एकत्रीत बसून चौकटीतच निर्णय घेतील.

‘मी पुन्हा येईल’ या वाक्याचा उपयोग आता आम्हाला आणि सोशल मिडीयाला देखील होतो आहे, असा चिमटा त्यांनी एका प्रश्नावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काढला. भाजपा नेते आमचे सरकार येणार असा दावा रोज करत आहेत. भाजपचा सरकार स्थापन्याचा दावा म्हणजे निवडणूकीत 220 जागा येणार या पोकळ ठरलेल्या घोषणेसारख्या आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. महायुतीत भाजपने सेनेला दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे शिवसेनेने मराठी बाणा दाखवून दिला, असे सूचक उत्तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतच्या प्रश्नावर दिले.

‘यामुळे’ राज्यपाल भेट लांबणीवर
सरकार स्थापनेसाठी राज्यपाल महोदयांकडे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या वतीने वेळ मागण्यात आली होती. मात्र राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात केंद्राने हिशोब तपासणीसाठी निरीक्षक पाठविले आहेत. सोबतच अवकाळी पावसाने ग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदतीची आणि धीर देण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यपालांची भेट एक आठवडा लांबणीवर पडली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार थोरात यांनी स्पष्ट केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!