बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरण : सावकार वाघ पिंजर्‍यात

0

नवनाथ वाघ, यशवंत कदम दररोज 2 लाख व्याज घ्यायचे, अखेर मुलगी अमृताची फिर्याद

अहमदनगर (प्रतिनिधी) – बँकांचे घेतलेले कर्ज उत्पन्नातून फेडणे शक्य होते. पण खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून वडील बाळासाहेब पवार यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांची मुलगी अमृता हिने फिर्यादीत केला आहे. नवनाथ वाघ आणि यशवंत कदम हे दररोज 2 लाख रुपये व्याजाचे पैसे घेऊन जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी नवनाथ विठ्ठल वाघ या खासगी सावकाराला बेड्या ठोकल्या आहेत.

31 मार्च रोजी उद्योजक बाळासाहेब पवार यांनी स्वत:च्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. धार्मिक विधी व दुखाच्या सावटामुळे फिर्याद देण्यास विलंब झाला. पवार कुटुंबाचा ओम मातोश्री पेट्रोलपंप, ओम भूईकाटा, ओम सर्व्हिस सेंटर तसेच अरणगाव येथील शेतीवर उदरनिर्वाह चालत.

बी.एच.आर संस्था, श्रीराम फायनान्स, टाटा कॅपिटल, श्रीराम सिटी, अ‍ॅक्सिस बँक, अंबिका महिला बँक यासह अन्य बँकांचे पवार यांच्यावर कर्ज होते. वेळोवेळी परतफेड करून त्यांनी ते ऋण कमी केले होते. अरणगाव येथील शेती डेव्हलप करण्यासाठी बाळासाहेब पवार यांनी नवनाथ विठ्ठल वाघ, यशवंत कदम, विनायक रणसिंग (कर्जत), श्रीमती जीजी कटारिया या चौघांकडून काही कोटी रुपये कर्ज घेतले. 10 ते 15 टक्के व्याजाचा दर आणि चक्रवाढ व्याजामुळे वडील कर्ज फेडून वैतागले होते. पवार यांना त्यांच्या धंद्यातून दररोज सुमारे साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळत. हे उत्पन्न या सावकारांचे व्याज देण्यातच जात. त्यामुळे बँका व संस्थांचे कर्ज फेडणे अवघड झाले होते. कर्ज फेडण्याकरीता पवार यांनी प्रॉपर्टी विकण्याचा निर्णय घेतला, पण मोठे ग्राहक न मिळाल्याने तो व्यवहारच झाला नाही. वाघ, कदम, रणसिंग व कटारिया या सावकारांनी वेळोवेळी माणसं पाठवून अथवा स्वत: येऊन पवार यांच्याकडून पैसे घेतले.

ललित गुंदेचांनी घेतला बंगला
स्व. बाळासाहेब पवार हे सावकाराच्या कर्जाला कंटाळले होते. हे कर्ज फेडण्यासाठी पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी प्लॉट नंबर 17 मधील बंगला विकण्याचा निर्णय घेतला. मार्च 2018 मध्ये पवार यांचा बंगला ललित गुंदेचा यांनी विकत घेतला. त्यातून मिळालेल्या 1 कोटी 84 लाख रुपयांतून पवार यांनी अ‍ॅक्सेस बँकेचे कर्ज फेडले असल्याचा उल्लेख अमृता पवार यांच्या फिर्यादीत आला आहे.

सावकारांची दादागिरी
नवनाथ हा सावकार वर्षभरापासून व्याजाचे 1 लाख रुपये कधीकधी 2 ते 3 लाख असे प्रतिमहिना 35 ते 40 लाख रुपये घेऊन जायचा. तो कधी अरणगाव येथील शेतीमध्ये येऊन तर कधी पंपावर येवून बाळासाहेब यांना खूप पैसे मागायचा. नाही दिले तर बदमानी करीन, जीवे ठार मारून टाकीन अशी धमकी द्यायचा. त्याला पवार खूप त्रासले होेते. यशवंत कदम हा सावकार तर रात्री-अपरात्री येऊन व्यासयातून मिळालेल्या पैशातून दररोज एक लाख रुपये घेऊन जात. तो प्रति महिना 30 लाख रुपये घेऊन जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*