Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बोरसेंच्या विजयाला पॉवर बँकांची मदत विकासाला बगल अन् आत्मकेंद्रीत राजकारणामुळे चव्हाणांचा घात

Share

सटाणा । शशिकांत कापडणीस

बागलाण विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार माजी आ. दिलीप बोरसे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार आ. दीपिका चव्हाण यांचा प्रचंड मताधिक्याने पराभव केला. बोरसेंना दुसर्‍यांदा आमदारकी प्राप्त होण्यात वेगवेगळ्या पॉवर बँक प्रभावी ठरल्या असून आपल्या कामकाजाचे सातत्याने सादरीकरण करून देखील सक्षम जनाधार असल्याचा चव्हाण यांचा भ्रमाचा भोपळा फुटला.

ऑक्टोंबर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप बोरसे यांचा अवघ्या चार हजार मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला होता. या निवडणुकीपुर्वी त्यांचे बंधू उमाजी बोरसे यांनी कोट्यवधी रूपयांच्या विकासकामांचा दावा करणार्‍या तत्कालीन आ. संजय चव्हाण यांचा पराभव केला होता. नंतरच्या काळात जातपडताळणीच्या मुद्यावर आमदारकीपासून वंचित झालेल्या संजय चव्हाण यांच्यानंतर बागलाणने त्यांच्या पत्नी दीपिका चव्हाण यांना संधी दिली. गेल्या पाच वर्षात तालुक्यात जनसंपर्क, विधानसभेच्या कामकाजात शंभर टक्के उपस्थिती व प्रश्न मांडण्यात देखील अग्रभागी असणार्‍या चव्हाण यांना तब्बल 33 हजार 694 मतांच्या फरकाने पराभूत करीत या निवडणुकीत दिलीप बोरसे आमदार झाले.

या निकालातून राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाविरूध्द आमदार निवडण्याची परंपरा खंडीत झाली. दुसर्‍यांदा लोकसभा निवडणुकीत खासदार झालेले डॉ. सुभाष भामरे यांनी बागलाण तालुक्यातील सिंचनासह इतर प्रश्न सोडविण्यासाठी जोपासलेला जनसंपर्क खर्‍या अर्थाने भाजपा उमेदवारासाठी पॉवर बँक ठरली तर समाज फॅक्टरच्या अस्त्राने देखील आपला प्रभाव दाखवला.

गत निवडणुकीत मोदी लाटेत देखील बागलाणचा गड राखणार्‍या राष्ट्रवादीच्या आ. दीपिका चव्हाण यांची यंदाच्या निवडणुकीत शिवसेना प्रवेशासाठी पडद्यामागे झालेल्या हालचालींची खबर दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहचली होती. तथापि अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीने दीपिका चव्हाण यांना उमेदवारी दिली. चव्हाण दाम्पत्यांची तळ्यात-मळ्यात भूमिका, आत्मकेंद्री राजकारण होत असल्याची स्वकियांची भावना आणि खा.डॉ. सुभाष भामरे यांच्या परिश्रमामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा सुटत असलेला प्रश्न तसेच अती आत्मविश्वास आदी मुद्यांमुळे चव्हाणांना पराभवाचे धनी व्हावे लागले.

मतमोजणीत पहिल्या फेरीपासून बोरसेंनी आघाडी घेतली. त्यात चव्हाणांना कायम साथ देणार्‍या सटाणा शहराने आपले वजन बोरसेंच्या पारड्यात टाकल्याचे दिसून आले. त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला बायपास रस्त्याचा प्रश्न तसेच शहराच्या जिव्हाळ्याचा पुनद पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा प्रभावी ठरला. बहुचर्चित केळझर पाणीपुरवठा योजना रद्द कां झाली?

यामागे कुणाचे षडयंत्र होते? 38 खेड्यांच्या मतांसाठी सटाणा शहराचा बळी दिला गेला कां? आदी प्रश्न उपस्थित होत असतांना सद्यस्थितीत पुनदच्या बाबतीत देखील चव्हाणांतर्फे श्रेयाचे राजकारण करून योजनेला अपशकून होत असल्याची भावना शहरवासियांमध्ये निर्माण झाली. पुनद योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासह शहरासाठी पाण्याचे आरक्षण निश्चित केल्याचा चव्हाणांचा दावा असला तरी प्रत्यक्षात योजनेला मंजुरी व धरणापासून प्रत्यक्ष कामास सुरवात उच्च न्यायालयातील जनहित याचिकेचा निकाल तसेच या योजनेसाठी खा.डॉ. सुभाष भामरे, नगराध्यक्ष सुनिल मोरे यांचे निरंतर परिश्रम प्रभावी ठरल्याची भावना शहरवासियांमध्ये निर्माण झाली होती. या भावनेचा लाभ बोरसेंना झाला.

शहरात सातत्याने होणार्‍या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुर्वी राज्य शासनाकडे असलेल्या व नंतर केंद्राच्या अखत्यारीत गेलेल्या शहराबाहेरील बायपास रस्त्याबाबत देखील चव्हाणांना अपयश आले. बायपास पुर्वेकडून की पश्चिमेकडून या गोंधळात रस्त्याच्या कामाला वेळोवेळी विरोध कुणी केला? याबाबतचे सत्यही शहरवासियांसमोर आहे. कुटूंबात दोन वेळा नगराध्यक्षपद व दोनवेळा आमदारकी मिळून देखील समस्या सोडविण्यात चव्हाणांना अपयश आल्याने त्याचा फटका देखील त्यांना बसला. जनतेच्या समस्या असो की जिव्हाळ्याचे प्रश्न या संदर्भात पत्रकबाजी अथवा आंदोलन केले म्हणजे काम झाले, असे नाही तर हे प्रश्न सुटणे जनतेच्या दृष्टीकोनातून महत्वाचे असते.

या निवडणुकीत समाज फॅक्टरबरोबर महायुतीचे सर्व नेते एकदिलाने लढले त्याचा लाभ बोरसेंना झाला. नगराध्यक्ष सुनिल मोरे, महेंद्र भामरे, नारायण कोर, गुलाबराव कापडणीस, डॉ. राजेश मोरे आदी नेत्यांचे पाठबळ व खा.डॉ. भामरे यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे बोरसेंचे मताधिक्य वाढविणारी ठरली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!