Video : आदिवासी विकासच्या कर्मचाऱ्यांचे ‘लेखणीबंद’

बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केलेल्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ कर्मचारी एकवटले

0
नाशिक : आदिवासी विकास भवन कार्यालयात  अनुसूचित जाती-जमाती जात पडताळणी समिती उपसंचालकासोबत बागलाणच्या विद्यमान आमदार दीपिका चव्हाण यांचे पती माजी आमदार संजय चव्हाण यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या निषेधार्थ आज येथील कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरु केले आहे.

लेखणी बंद आंदोलन सुरु केल्यामुळे सर्वच कामे ठप्प झाली आहेत. अधिक माहिती अशी की, काल (दि.५) माहिती अधिकारान्वये विचारलेल्या माहितीवरून शिवीगाळ करणे आणि अंगावर धावून जाण्याचा आरोप आदिवासी विकास विभागातील जात पडताळणी समिती उपसंचालकांनी फिर्यादित केला होता. त्यानंतर चव्हाण यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली होती.

हेमंत मधुकर पिचड यांच्याबाबत माजी आमदार संजय चव्हाण यांनी माहिती अधिकारातून काही माहिती मागितली होती. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु असताना चव्हाण याठिकाणी पोहोचले. त्यांनी माहिती अधिकार अर्जाबाबत विचारणा करत अर्वाच्य भाषेत कुमरे यांना शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीतून केला आहे.

दरम्यान, माजी आमदार संजय चव्हाण यांनीही मुंबई नाका पोलीस ठाण्याने लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यात माजी आमदार चव्हाण यांनी म्हटले आहे की, समिती उपसंचालक यांनी सांगितल्याप्रमाणे रीतसर फी अदा केली असून पावती घेतली आहे. मात्र दोन महिने झाले तरी अद्याप माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना विचारण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा त्या महिला उपसंचालकांनी अरेरावीची भाषा करत तुम्ही आणि तुमचे पूर्वज बोगस आदिवासी असल्याचे म्हणत अपमान केला. तसेच पुढे त्या म्हणाल्या की, मी बोगस आदिवासिंविरोधात बंद पुकारले असून वडिलांचे नाव घेत त्यांनी नको ती भाषा आयुक्तांसमोरच वापरली. मी तुम्हाला अजिबात तुम्ही विचारलेली माहिती देणार नाही. माझी तक्रार तुम्ही मुख्यमंत्री किंवा आदिवासी मंत्री यांच्याकडे जरी केली तरी चालेल.

राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड आणि राष्ट्रवादीच्याच आमदार दीपिका संजय चव्हाण यांच्यात आधीपासूनच संघर्ष झालेले आहेत. आज मधुकर पिचड नाशिकमध्ये येत आहेत ते या प्रकाराबाबत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

LEAVE A REPLY

*