विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरू

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक तसेच निकृष्ट जेवणाला कंटाळून पाईपलाईन रोड येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शनिवारी अन्नत्याग सुरू केले होते. हे आंदोलन रविवारी दुसर्‍या दिवशीही संध्याकाळपर्यंत सुरू होते.
या आंदोलनास चर्मकार उठाव संघाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे, आदिवासी युवा संघटनेचे अध्यक्ष महेश शेळके, गौतम सातपुते, नगरसेविका प्रतिभा भांगरे, प्रकाश पोटे, सुनील केदार, विलास भारमळ, सागर भांगरे, विशाल देवके, शंकर लांघी, नितीन साबळे, अभिजित भांगरे, हिरामण पोपेरे, आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
शहरात जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी या वसतिगृहात राहत आहेत. विद्यार्थ्यांना नित्कृष्ट पध्दतीचे जेवण व अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. तसेच वसतिगृहाचे गृहपाल यांच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करून, त्यांच्या बदलीची मागणी केली. जोपर्यंत गृहपालाची बदली होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
या आंदोलनाची दखल घेऊन आदिवासी वसतिगृहाचे प्रकल्प अधिकारी नाशिक येथून नगरला येण्यासाठी निघाले आहेत. ते रात्री उशीरा आंदोलनस्थळी पोहचून विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. वसतिगृहाचे गृहपाल धनंजय खेडकर यांची तातडीने बदली करावी.
विद्यार्थ्यांना मंजूर क्षमतेइतकी शासकीय इमारत उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थ्यांसाठी कॉट, नेट सुविधा, संगणक लॅब, अभ्यासिका वर्ग, शुध्द पिण्याचे पाणी उपलब्धता करून द्यावे. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या जेवणात सुधारणा करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*