निकृष्ट जेवणाला कंटाळून विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन

0
आदिवासी विद्यार्थी वसतीगृहातील प्रकार : राष्ट्रवादीचा आंदोलनास पाठिंबा
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक तसेच निकृष्ट जेवणाला कंटाळून पाइपलाईन रोड येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अन्नत्याग करत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.
विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी आलेले वसतीगृहाचे वरिष्ठ निरीक्षक यु.एस. तेलोरे यांना आदिवासी विद्यार्थी व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी चांगलेच धारेवर धरले. तेलोरे यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्‍न जाणून घेवून, सोमवार (दि.04) ला सदर प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरातजिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी या वसतीगृहात राहत आहे.
विद्यार्थ्यांना निकृष्ट पध्दतीचे जेवण व अपमानास्पद वागणुक मिळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तसेच वसतीगृहाचे गृहपाल यांच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करुन, त्यांच्या बदलीची मागणी केली. जो पर्यंन्त गृहपालाची बदली होत नाही तो पर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता. या प्रश्‍नावर काही दिवसापुर्वी विद्यार्थ्यांनी राजूर (ता.अकोले) येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास निवेदन दिले होते. याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले.
या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, संजय दिवटे, करण वाघमारे, विष्णू हरबा, गणेश ग्यानप्पा, लंकेश चितळकर, हेमंत शिरसाठ, प्रज्वल सोरटे, सागर भांगरे, सुनिल आंबेकर, गणेश शेलार, अर्जुन लेंभे, अक्षय बांबळे, मनोज जाधव, आकाश आहिरे, गणेश बर्डे आदिंसह वसतिगृहातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
वसतीगृहाचे गृहपाल धनंजय खेडकर यांची तातडीने बदली करावी. विद्यार्थ्यांना मंजूर क्षमतेइतकी शासकीय इमारत उपलब्ध करुन द्यावी. विद्यार्थ्यांसाठी कॉट, नेट सुविधा, संगणक लॅब, अभ्यासिका वर्ग, शुध्द पिण्याचे पाणी उपलब्धता करुन द्यावी. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या जेवणात सुधारणा करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*