भारतीय उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी ‘या’ बाबतीत बिलगेट्सलाही मागे टाकले

0

मुंबई । प्रतिनिधी

व्हिप्रोचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या मार्फत देण्यात येणाऱ्या देणगीत ५२ हजार ७५० कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या एकूण देणगीची रक्कम १ लाख ४५ हजार कोटी रुपये झाली आहे. या रकमेमुळे अझीम प्रेमजी फाउंडेशन सामाजिक कार्यासाठी सर्वाधिक निधी देणारी कॉरपोरेट संस्था बनली असून याबाबतीत प्रेमजींनी बिल गेट्सलाही मागे टाकले आहे.

सामाजिक कार्यात, गरिबांसाठी मदत करण्याबाबत भारतीय उद्योगपती उदासीन असल्याचे बोलले जाते मात्र अझीम प्रेमजी अपवाद ठरले आहेत. आपली ५० टक्के संपत्ती दान करू अशी घोषणा काही वर्षांपूर्वी अझीम प्रेमजी यांनी केली होती.

त्यानुसार व्हिप्रोच्या नफ्यातील मोठा वाटा ते अझीम प्रेमजी फाउंडेशनला दान करतात. हा पैसा संपूर्ण देशभर गरीब, वंचित मुलांच्या शिक्षणावर खर्च केला जातो. अझीम प्रेमजी विद्यापीठही शिक्षणाचे कार्य करते. या कार्याला अधिक गती यावी म्हणून प्रेमजींनी देणगीची रक्कम वाढवली आहे.

व्हिप्रोमध्ये प्रेमजी कुटुंबाचे ७४ टक्के शेअर्स आहेत. त्यातील ६७ टक्के शेअर्समधून येणारं उत्पन्न प्रेमजी समाजसेवेसाठी, गरीबांसाठी दान करतात. या पैशातून उभारलेल्या अझीम प्रेमजी विद्यापीठात सध्या १३०० विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या १४ हजारपर्यंत नेण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे.

LEAVE A REPLY

*