नंदुरबार जिल्ह्यातील 13 आरोग्य संस्थांना ‘कायाकल्प पूरस्कार’ जाहीर

jalgaon-digital
2 Min Read

नंदुरबार | प्रतिनिधी – NANDURBAR

नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थामध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण निर्माण करुन नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडून कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. 2021-2022 या वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्याला 13 कायाकल्प पूरस्कार जाहीर झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी (District Health Officer Dr. Govind Chaudhary) यांनी दिली.

यात जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार, उपजिल्हा रुग्णालय नवापूर, ग्रामीण रुग्णालय खोंडामळी, खांडबारा तसेच खापर, बोरद, सोमावल, नटावद, तलई, सुलवाडे, कुसूमवाडा या प्राथमिक आरोग्य केंद्राना प्रोत्साहनपर पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र, लहान शहादा व आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, नांदरखेडा यांना प्राप्त झाला आहे.

देशात 2 ऑक्टोबर 2014 महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात झाली आहे. नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने 15 मे 2015 पासून कायाकल्प पुरस्कार देण्यात येत आहे. योजनेत सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राना सहभागी होता येते. पुरस्कारासाठी रुग्णालयांची अंतर्गत व बाह्य परिसरातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, बेड स्वच्छता, उपलब्ध साधनांचा वापर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, रुग्णसेवा, बायोमेडीकल घन व द्रवरुप कचऱ्यांची विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व पाणीबचत, सांडपाण्याचा निचरा आदी प्रत्येक बाबींसाठी गुण निश्चित करुन शासनाकडून उत्कृष्ठ उपाययोजनांवर आधारीत संस्थांना पुरस्कृत करण्यात येते.

जिल्ह्यातील 13 आरोग्य संस्थाना मिळालेल्या कायाकल्प पुरस्काराबद्दल जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी यांनी जिल्हास्तरीय अधिकारी व पुरस्कार प्राप्त सर्व आरोग्य संस्थांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. लवकरच जिल्हास्तरीय कार्यक्रमात पुस्कार वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

आता राष्ट्रीयस्तरासाठी तयारी

जिल्ह्याला राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर झाले असले तरी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीयस्तरावरील नॅशनल क़्वालिटी अशुरन्स स्टॅडर्ड (एन.क्यू.ए.एस.) पुरस्कारासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र लहान शहादा व आरोग्यवर्धिनी उपकेंद्र नांदरखेडा ता.नंदुरबार येथे राष्ट्रीय आरोग्य संसाधन प्रणाली, नवी दिल्ली येथील टिमने भेट देवून पाहणी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *