समाज वेदनेतूनच श्रेष्ठ दर्जाचे साहित्य निर्माण होते

0

डॉ. अक्षयकुमार काळेः पद्मश्री डॉ. विखे पाटील साहित्य पुरस्कारांचे वितरण

लोणी (वार्ताहर)- कोणत्याही क्षेत्रात काम करताना समाजाबद्दल मनात करूणा असेल तरच श्रेष्ठ काम करता येते. पद्मश्री विखे पाटील यांचे कार्य यामुळेच प्रेरणादायी ठरत असून नवोदित साहित्यिकांनी समाज जीवनाचे वेगवेगळे स्वरूप समजून घेत साहित्याची निर्मिती करावी असे आवाहन 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी केले.

यावेळी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार डॉ. गणेश देवी यांना तर राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार प्रवीण बांदेकर यांना देऊन गौरविण्यात आले. प्रवरा औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक समूहाच्यावतीने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 117 व्या जयंती निमित्त साहित्य पुरस्कारांचे प्रवरानगर येथे सोमवारी वितरण करण्यात आले. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. काळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, डॉ. सुजय विखे, डॉ. राजेंद्र विखे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, गणेशचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, नंदकिशोर राठी, सभापती बापूसाहेब आहेर, पंचायत समितीच्या सभापती सौ. हिराबाई कातोरे, डॉ. भास्कर खर्डे, पोपटराव लाटे, राजेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गणेश देवी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार 1 लाख रुपये, स्मृती चिन्ह, उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीसाठी प्रवीण बांदेकर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार 51 हजार व स्मृती चिन्ह, सांगायलाच हवं असं नाही या कवितासंग्रहासाठी भगवान निळे यांना विशेष साहित्य गौरव पुरस्कार 31 हजार व स्मृती चिन्ह, काळ्या मातीचे अस्वस्थ वर्तमान या कविता संग्रहासाठी गणेश मरकड यांना अहमदनगर जिल्हा उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार 10 हजार व स्मृती चिन्ह, अशोक हांडे यांना कला गौरव पुरस्कार 25 हजार व स्मृती चिन्ह, सत्यपाल महाराज यांना समाज प्रबोधन पुरस्कार 25 हजार व स्मृती चिन्ह, अतुल पेठे यांना नाट्यसेवा पुरस्कार 25 हजार व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
डॉ. काळे म्हणाले की, समाज्याच्या वेदना समजल्याने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून परिवर्तन घडवले. साहित्यातूनही बदल आणि परिवर्तन घडलेच पाहिजे. लेखकाला येणारी अनुभूती त्याच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते. वैश्विक विचारातून दर्जेदार साहित्य निर्मिती शक्य होते. मानवी जीवनाच्या व्यापक अभ्यासावर लिखाणाची व्यापकता ठरत असते. लेखकाच्या ठिकाणी जीवनदृष्टी सर्वात महत्त्वाची असते.
लेखक वाचकांना जगण्याच्या पातळीवर विचार करायला लावणारा असतो.संतांचे काव्य शेकडो वर्षांपासून समाजाच्या ओठावर असण्यामागे त्यांची सामाजिक बांधिलकी आहे. ना. विखे पाटील म्हणाले, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी सत्तावीस वर्षांपूर्वी राज्यातील साहित्यिक, कवी, लेखक, कलाकार, प्रबोधनकार अशा विविध क्षेत्रातील समाजाचे प्रश्‍न घेऊन काम करणारांना पुरस्कार देऊन गौरविण्याचा निर्णय घेतला. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळू शकली.नवोदितांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम झाले.
पद्मश्री विखे पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यसरकारने त्यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवरा परिवाराने नेहमी चांगले आणि समाज परिवर्तनाचे काम करणारांचे कौतुक केल्याचे सांगत त्यांनी सर्व साहित्यिकांचे अभिनंदन केले. निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे व त्यांच्या समितीच्या सदस्यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
डॉ. सुजय विखे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक केले. डॉ. कसबे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. प्रवरा परिसरातील धानोरे येथील कैलास बाबुराव शिंदे यांची नुकतीच भारतीय प्रशासन सेवेमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. गणेश देवी, अशोक हांडे, सत्यपाल महाराज, अतुल पेठे, कैलास शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना दोन लाखांच्या विमा भरपाईचे धनादेश यावेळी देण्यात आले.

 

 

LEAVE A REPLY

*