पद्मश्री विखे पाटील जिवनगौरव पुरस्कारांचे सोमवारी वितरण

0

लोणी (प्रतिनिधी) – पद्मश्री डॉ. विट्ठलराव विखे पाटील यांच्या 117 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून देण्यात येणार्‍या राज्यस्तरीय साहित्य जीवनगौरव व कलागौरव पुरस्कारांचे वितरण सोमवार दि.7 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10 वा. नारळी पौर्णिमेच्या मुहुर्तावर करण्यात येणार असल्याची माहीती युवा नेते डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

पद्मश्री डॉ. विट्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन साहित्य, कला, नाट्य आणि सामाजिक प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तींना पद्मश्री विखे पाटील यांच्या नावाने पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. पुरस्कारांचे यंदाचे हे 27 वे वर्ष असून, पुरस्कार वितरण सोहळ्याचा समारंभ प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात सकाळी 10 वा. संपन्न होणार आहे.

पुरस्कारांचे वितरण अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्‍या या कार्यक्रमात यावर्षी पद्मश्री डॉ.विखे पाटील साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार कर्नाटक राज्यातील धारवाड येथील डॉ.गणेश देवी यांना देण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार प्रविण दशरथ बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कांदबरीस देण्यात येणार असून, विशेष साहित्य गौरव पुरस्कार भगवान निळे यांच्या सांगायलाच हवंय असं नाही या कविता संग्रहास, अहमदनगर जिल्हा उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार गणेश शिवाजी मरकड यांच्या काळ्या मातीचे अस्वस्थ वर्तमान या कविता संग्रहास देण्याचा निर्णय पुरस्कार निवड समितीने घेतला.

पद्मश्री डॉ.विखे पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार अशोक हांडे, पद्मश्री डॉ.विखे पाटील समाज प्रबोधन पुरस्कार ह.भ.प.सत्यपाल महाराज आणि डॉ.विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार अतुल पेठे यांना यावर्षी देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. विखे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*