मनाली कोल्हे ‘एज्युप्रनर ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मानित

0

शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्याची देश पातळीवर दखल

कोपरगाव (प्रतिनिधी) – संजीवनी अ‍ॅकॅडमीच्या संचालिका  मनाली अमित कोल्हे यांना त्यांच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण क्षेत्रात भरीव व नावीन्यपूर्ण योगदानाबद्दल नवी दिल्ली येथिल ‘अलर्ट नॉलेज सर्विसेस’ फाउंडेशनने ‘एज्युप्रनर ऑफ इंडिया 2017’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी मंत्री सैद शहानवाझ हुसेन यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे एका शानदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला, अशी माहिती संजीवनी अ‍ॅकॅडमीच्या प्राचार्या  श्रीनीला काला यांनी दिली.
पुरस्कार प्रदान सोहळ्यास एकेएस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिनेश कांब्रा, संचालक महेश कांब्रा, सल्लागार यशपाल वर्मा तसेच चंदीगड, बेंगलोर, हैदराबाद, नॉईडा, आसाम, रांची आदी ठिकाणच्या शिक्षण क्षेत्रातील महनीय व्यक्ती उपस्थित होत्या. श्रीनीला काला यांनी सांगितले, संचालिका मनाली कोल्हे यांनी कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात संजीवनी अ‍ॅकॅडमी या सीबीएसई पॅटर्नच्या स्कूलला अल्पावधीमध्ये दर्जेदार व गुणवत्ता पूरक शिक्षण देणार्‍या संस्थांच्या यादीत आणले.
सक्षम भावी पिढी घडविण्यासाठी त्यांनी स्कूलमध्ये विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. यामध्ये प्रामुख्याने परदेशांतील नामवंत प्रशिक्षकांना बोलवून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, क्रीडा, सांस्कृतिक, कला, स्पर्धात्मक परीक्षा आदी क्षेत्रांतील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर निपुणता प्राप्त प्रशिक्षक नेमून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे, असे उपक्रम राबवीत असतात. समाज आणि देश यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठीचे योगदान या सर्व बाबींची दखल घेऊन एकेएसच्या निवड समितीने सौ. कोल्हे यांची पुरस्कारासाठी निवड केली.
सौ. कोल्हे यांनी या यशाबद्दल प्रतिक्रीया व्यक्त करताना म्हणाल्या की माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी दर्जा व गुणवत्तेशी कधीही तडजोड करायची नाही ही शिकवण दिली आहे. पालक त्यांच्या पाल्यांना प्राधान्याने संजीवनीमध्ये दाखल करतात. म्हणून मी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या सहकार्याने विद्यार्थी, पालक व पर्यायाने समाज केंद्रबिंदू मानून कार्य करीत आहे. पुरस्काराच्या निमित्ताने हाती घेतलेले उपक्रम योग्य दिशेने चालू आहेत यावर शिक्कामोर्तब झाले, याचा आनंद आहे. मनाली कोल्हे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

LEAVE A REPLY

*