थोरात कारखान्याला राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार

0
संगमनेर (प्रतिनिधी) – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला या वर्षीचा साखर उद्योगात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कार्यक्षमतेचा सर्वाधिक साखर निर्यातीचा द्वितीय राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्यावतीने साखर उद्योगात उल्लेखनीय कार्य करणार्‍या साखर कारखान्यांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविले जाते.
माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने कायम उच्चांकी गाळप करत सर्वाधिक भाव दिला आहे. संगमनेर तालुका हा कमी पाऊस असलेला तालुका असूनही या कारखान्याने सातत्याने सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा मोठा विश्‍वास संपादन केला असून सतत ऊस विकासासाठी नवनवीन उपक्रम राबविले आहे.त या कारखान्याने 5500 मेट्रिक टन क्षमतेचा नवीन कारखाना अगदी कमी कालावधीत कार्यान्वित केला आहे. याच बरोबर 30 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पही सुरू केला आहे. सभासद व ऊस उत्पादकांबरोबर कामगारांचे हित जोपासत कार्यक्षेत्रात विविध सिमेंट बंधारे, चारी दुरुस्ती, रस्ते, पूल अशी समाजहिताची कामे केली आहेत.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर आर्थिक शिस्त, नियोजन व दूरदृष्टी ठेवून गुणवत्तापूर्वक राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे या कारखान्याला आतापर्यंत राज्य व देशपातळीवर अनेकवेळा गौरविले गेले आहे. सहकाराची पंढरी ठरलेल्या संगमनेरच्या शिरपेचात कारखान्याला मिळालेल्या या पुरस्काराने मानाचा तुरा रोवला आहे. सततच्या या गौरवास्पद वाटचालीत माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, सर्व संचालक व कार्यकारी संचालक जे. बी. घुगरकर यांचेही मोठे योगदान राहिले आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवार 25 सप्टेंबर 2017 रोजी दिल्ली येथे होणार असून थोरात कारखान्याला स्मतिचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
कारखान्याच्या या यशाबद्दल आमदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पाटील खेमनर, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, सत्यजीत तांबे, शिवाजीराव थोरात, अमित पंडित, शंकर पा. खेमनर, निशाताई कोकणे, बाबा ओहोळ, रामदास पा. वाघ, अजय फटांगरे, विश्‍वासराव मुर्तडक, बाळकृष्ण पा. दातीर, राजेंद्र कडलग, राजेंद्र गुंजाळ, आदींसह सभासद, ऊस उत्पादक व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

 

LEAVE A REPLY

*