दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे सरासरी गुण

jalgaon-digital
2 Min Read

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – करोना संकट आणि लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना इतर विषयांत मिळणारे सरासरी गुण लक्षात घेऊन त्यांना भूगोल (सामाजिक शास्त्रे पेपर – 2) या विषयाला गुण देण्यात येणार आहेत. शिक्षण मंडळाच्या निर्णयामुळे दहावीचा निकाल लवकर जाहीर होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याचसोबत दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील कार्यशिक्षण विषयाचे गुण सरासरीनुसार देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात दहावीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च 2020 दरम्यान नियोजित होती. सर्व पेपर झाल्यानंतर केवळ भूगोलाचा पेपर बाकी होता. मात्र करोना संकटामुळे हा पेपर आधी पुढे ढकलण्यात आला, मग शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा पेपर रद्द करत असल्याची घोषणा केली होती. दहावीचा (दि.23) मार्च रोजी भुगोल विषयाचा शेवटचा पेपर होणार होता.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाने याबाबतची आज माहिती दिली. आता दिव्यांग विद्यार्थ्यांना कार्यशिक्षण विषयाचे गुणही सरासरीनुसार मिळणार आहेत. सामाजिक शास्त्रे पेपेर-2 (भूगोल) या विषयाचे गुणदान हे उमेदवाराने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस पात्र केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून, त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.

तब्बल 17 लाखांहून अधिक विद्यार्थ्यी या परीक्षेला बसले होते. रद्द करण्यात आलेल्या पेपरचे गुणांकन करण्याबाबत संभ्रम होता. यासंदर्भात शालेय शिक्षण आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक झाली. मागील दोन आठड्यांपासून राज्य शिक्षण मंडळाने भूगोलच्या पेपरला गुण देण्यासंदर्भातील विविध पर्यायांचा अहवाल मंत्रालयात पाठवला होता. परंतु त्यावर मंगळवारी उशिरा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

त्याच पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या भूगोलाच्या पेपरला गुण देण्यासंदर्भात निर्णय घेतला. दहावीची परीक्षा दिलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये मिळणाऱया गुणांची सरासरी लक्षात घेऊनच भूगोलच्या पेपरला गुण दिले जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर इतर कोणताही शेरा नसेल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दहावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांना मात्र स्वतंत्र सवलत देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना भूगोलचे गुण देताना त्यांची मागे घेण्यात आली तोंडी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षेच्या गुणांची सरासरी विचारात घेतली जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना भूगोलाच्या गुणांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *