नाशिक जिल्ह्यात सरासरी 94 टक्के पेरणी ; अति पावसाच्या तालुक्यांत पेरण्या खोळंबल्या

0
नाशिक । जिल्ह्यातील पूर्व भागातील नांदगाव, येवला, कळवण, बागलाण तालुक्यात खरीप पेरण्या 100 टक्के तर अधिक पाऊस झालेल्या नाशिक, इगतपुरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात पेरण्यांची सरासरी 94 टक्के नोंद झाली आहे.

जिल्ह्यात पश्चिम पट्ट्यात संततधार सुरू होती म्हणून नाशिक, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी येथे पेरण्याची गती मंदावली होती. भात, सोयाबीन, वरई, नागली, या खरीप पिकांची लागवड करण्यासाठी पावसाने उघडीप द्यावी, याची प्रतीक्षा शेतकर्‍यांना होती. त्यामुळे या तालुक्यातील पेरण्यांचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर शेतात पाणी साचल्याने त्यांचा निचरा होईपर्यंत पेरण्याचे काम रखडून पडल्याची चर्चा शेतकरी वर्गात होती.

जिल्ह्यात खरीप पेरणी एकूण सहा लाख 11 हजार 712 हेक्टरवर झालेली आहे. त्यात सर्वाधिक पेरणी येवला तालुक्यात झाली आहे. येथे 123 टक्के पेरणी झाली आहे. तर मालेगाव तालुक्यात सुमारे 76 हजार 753 हेक्टरवर पेरणी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. सटाणा तालुक्यात 65 हजार 749 हेक्टर, नांदगाव तालुक्यात 66 हजार 169, कळवणमध्ये 541 हजार 907, देवळा तालुक्यात 27 हजार 906, दिंडोरी तालुक्यात 16 हजार 196 हेक्टर, सुरगाण्यात 25677 हेक्टर, नाशिक तालुक्यात 13010 हेक्टर, त्र्यंबकेश्वरला 20518, इगतपुरी 24694, पेठ 19958, निफाड 32348, सिन्नर 56257, येवला 65970, चांदवड 48559 हेक्टर क्षेत्र पेरणीखाली आले आहे.

नांदगाव तालुक्यात सर्वाधिक कापूस लागवड : कमी पावसावर अधिक पीक देणारे म्हणून कापूस हे पीक मालेगाव तालुक्यात सुमारे 18 हजार 835 हेक्टरवर लागवड करण्यात आले आहे. सटाणा तालुक्यातही कपासीची लागवड 26 हेक्टरवर आहे. नांदगाव तालुक्यात 13 हजार 627 हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. त्या खालोखाल येवला 11 हजार 915 हेक्टर, सिन्नर 467 आणि निफाड तालुक्यात 37 हेक्टरव कापूस लागवड करण्यावर शेतकर्‍यांनी भर दिला.

तुरीचे क्षेत्र वाढले : जिल्ह्यात सर्व भागात कमी अधिक स्वरुपात तुरीची लागवड शेतकर्‍यांनी केली आहे. त्यामुळे सुमारे 9656 हेक्टरवर तूर लागवड झाली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र येवला तालुक्यात आहे. तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यात तूर लागवड सर्वाधिक असून, दिंडोरी, सिन्नर, पेठ, सुरगाणा भागात तुरीच्या लागवडीला शेतकर्‍यांनी पसंती दिली आहे.

LEAVE A REPLY

*