Monday, April 29, 2024
Homeनगरझोपेतील विद्यार्थिनीला पेटविण्याचा प्रयत्न

झोपेतील विद्यार्थिनीला पेटविण्याचा प्रयत्न

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणारे जिल्ह्यातील एकमेव पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 11वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीला झोपेतच गादीसह (बेड) पेटविण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना बुधवार दि.29जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून यामध्ये वैष्णवी भांगरे (रा.बोधेगाव, ता.शेवगाव) ही भाजली असून, तिच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

याच नवोदय विद्यालयातील इयत्ता 11 वीच्या रुतुजा घाडगे,राजनंदीनी भिसे (इ.6वी), प्राजक्ता पोटे (इ.6वी) या तीन विद्यार्थींनीच्या गाद्या जळाल्या असून या घटनेतून त्या बालंबाल बचावल्या आहेत. या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात प्राचार्य एस. पी. बोरसे यांनी दिली. पारनेरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे तर दुसरीकडे या आग प्रकरणी कंत्राटी महिला कामगाराचा पोलिसांनी जबाब नोंदविला असून विद्यालयाने चौकशी समिती नेमली आहे. विद्यालयातील अरवली हाऊस मधील ही घटना असून इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना येथील वादातून ही घटना झालेली असावी अशी शक्यता प्राचार्य बोरसे यांनी व्यक्त केली आहे .या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वैष्णवी भांगरे हिला जिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.

- Advertisement -

प्राचार्यांचे वाहन जाळले
हे निवासी विद्यालय असून प्राचार्यांसह शिक्षक व विद्यार्थी या ठिकाणी राहतात. परंतु प्राचार्य हे नवी दिल्ली येथे 19 जानेवारीला कार्यालयीन कामासाठी गेले होते. त्यांच्या घरासमोर उभी असलेली चार चाकी क्रमांक एमएच 18 एजे 3412 ही गाडी अज्ञात इसमाने पेटवून दिल्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती. यात एमएच 15 एटी या दुचाकीचा देखील काही भाग जळाला होता. या अग्निकांडामुळे शिक्षक,पालक व विद्यार्थी धास्तावले आहेत.

प्राचार्य व शिक्षक तर विद्यार्थ्यांमध्ये दुही ?
हे विद्यालय पुणे विभागात प्रथम क्रमांकाचे गणले जात असताना, या विद्यालयात दहा दिवसांत दोन अग्नीकांडाच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटना संशयास्पद असून, प्राचार्य बोरसे व शिक्षक कर्मचार्‍यांत मतभेद असल्याने त्यांची चारचाकी जाळल्याची चर्चा रंगू लागली आहे. तर दुसरीकडे विद्यालयातील मुलींच्या वस्तीगृहातील चार गाद्याला (बेड)आग लागून एक विद्यार्थीनी जखमी झाली तर तीन मुली बचावल्या आहेत.या आगीचा घटनाक्रम पाहता प्राचार्य व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यामध्येही दुही असून, यातूनच या दोन्ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या