घोटीत पितापुत्रावर प्राणघातक हल्ला; दोघे जखमी

0
कावनई : घोटी जवळील सिन्नर फाट्यावर काल मंगळवार रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी एका घरात घुसून एका अपंग व्यक्तीसह त्याच्या मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.

या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून ,त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालस्यात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा हल्ला का झाला याबाबत पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घोटी सिन्नर चौफुलीवर मंगेश मुरलीधर पवार यांचे रस्त्यालगत हॉटेल आहे. या हॉटेलच्या पाठीमागील बाजूस ते आपल्या कुटुंबासह राहतात. आज पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागील बाजूने असलेल्या खिडकीतुन प्रवेश करीत घरात झोपलेल्या मंगेश पवार व त्यांची पत्नी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान ही बाब त्यांचा मुलगा ओम याने पाहिल्यानंतर त्याने विरोध केला असता अज्ञात हल्लेखोरांनी सर्व कुटुंबावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला.

यात मंगेश पवार यांच्या छातीवर चाकूचे वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत तर त्यांचा मुलगा ओम याच्या पोटात चाकू भोकसल्याने गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, या दोन्ही गंभीर जखमींना उपचारार्थ नाशिकला हलविण्यात आले आहे.

अपंग व्यक्ती असलेल्या मंगेश पवार आणि त्याच्या कुटुंबियावर झालेला हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याचा पोलीस शोध घेत आहेत.

घोटी पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपअधीक्षक दत्तात्रय घोगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन  तपासाच्या सूचना केल्या.

अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन तेली, हवालदार सुहास गोसावी,धर्मराज पारधी,आदी करीत आहेत.

LEAVE A REPLY

*