तहसीलदारांसह महसूल पथकावर हल्ला : वाळूचा ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

0
सोनई (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील सोनई जवळील खेडलेपरमानंद येथे मुळा नदीपात्रात वाळूतस्करी करणारा ट्रॅक्टर अडवला असता संबंधीत वाळू तस्करांनी तहसीलदार उमेश पाटील यांच्यासह महसूलच्या पथकाला धक्काबुक्की करुन अंगावर ट्रक्टर घालण्याचा प्रयत्न करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल घडली असून याबाबत सोनई पोलीस ठाण्यात रात्री उशिरा जीवे मारण्याचा प्रयत्न, वाळू तस्करी व सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत खेडलेपरमानंदचे कामगार तलाठी गोरक्षनाथ जगन्नाथ भालेराव (वय 53) रा. मुकिंदपूर ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यावरुन नानासाहेब रंगनाथ शिंदे, नितीन साहेबराव शिंदे,  निलेश गंगाराम शिंदे व अन्य अज्ञात 3 ते 4 जण अशा 6 ते 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले की, रविवार दि. 16 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास फिर्यादी व साक्षीदार हे महसूल विभागाचे अधिकारी तहसीलदार उमेश पाटील व स्टाफसह वाळू चोरी प्रकरणाची कायदेशीर शासकीय काम करत असताना आरोपींनी बेकायदा मंडळी जमवून फिर्यादी व साक्षीदार यांच्या अंगावर धावून जावून त्यांना धक्काबुक्की केली.
त्यापैकी नानासाहेब रंगनाथ शिंदे याने महसूल विभागाच्या ताब्यातून ट्रॅक्टर
घेवून वाळू खाली करुन जबरदस्तीने घटनास्थळावरुन ट्रॅक्टर नेत असताना तलाठी व महसूल पथकाचे अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करुन महसूल कर्मचार्‍यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व दहशत निर्माण केली तसेच शासकीय कामकाजास हरकत व अडथळा आणला.
या फिर्यादीवरुन सोनई पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट 96/2017 भारतीय दंड विधान कलम 307, 353, 379, 332, 143, 149, 186 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या भागात वाळू चोरी रोखण्यासाठी कुठलाही चेकनाका नाही. त्यामुळे वाळू वाहतूक राजरोस चालू असून आता कारवाई झाली. पुढेही अशीच कारवाई पोलीस व महसूल विभागाकडून केली जावी अशी अपेक्षा सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

*