संगमनेरमधील स्टेट बँकेचे एटीएम फोडले, 26 लाख 30 हजार लुटले

0
संगमनेर (प्रतिनिधी)-जिल्ह्यात विविध बँकांचे एटीएम फोडून लाखो रुपये लंपास झाल्याच्या घटना घडत असतांना संगमनेरात मंगळवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास ऑरेंज कॉर्नरवरील स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. एटीएममधून 26 लाख 30 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. तर त्याच रात्री बीएड कॉलेजजवळील इंडीकॅश एटीएम मशिन सेंटर चोरट्यांनी फोडले. या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
स्टेट बँकेचे ऑरेंज कॉर्नर येथे नव्याने एटीएम सुरू झाले आहे. गेल्या शुक्रवारी या एटीएममध्ये कॅश टाकण्यात आली होती. सदर एटीएम मशिन सेंटरवर बँकेकडून सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आला होता. मात्र संध्याकाळी एटीएम सेंटर बंद करण्यात येते व पुन्हा सकाळी उघडण्यात येते. त्याप्रमाणे सुरक्षा कर्मचारी सकाळी तेथे आला.
त्याला एटीएम सेंटरची कुलुपे तुटलेली दिसली. त्याने तात्काळ स्टेट बँकेचे मॅनेजर राम विष्णू वेजरे यांना सांगितले. माहिती मिळताच श्री. वेजरे यांनी संगमनेर शहर पोलिसांना खबर देत घटनास्थळ गाठले. त्यापाठोपाठ उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण परदेशी व कर्मचारी दाखल झाले.
एटीएम मशिन सेंटरची कुलुपे गॅस कटरच्या सहाय्याने चोरट्याने तोडून आत प्रवेश केला. प्रथम त्याने सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. त्यानंतर त्याने एटीएम मशिन गॅस कटरच्या सहाय्याने तोडले. व त्यातील 26 लाख 30 हजार रुपयांची रोकड लांबविल्याचे बँक अधिकार्‍यांच्या लक्षात आले.
घटनेची दखल घेत नगरचे ठसे तज्ज्ञ पथक व नाशिकहून श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. दुपारी 1 वाजेपर्यंत ही पथके घटनास्थळी दाखल झाली. अहमदनगर आयकर युनिटच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता धुमाळ, सुभाष सोनवणे व नाशिक आयकर युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
याबाबत स्टेट बँकेचे मॅनेजर राम वेजरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दि. 6 नोव्हेंबर रोजी 8.30 ते 7 नोव्हेंबर सकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान एटीएम मशिन सेंटर फोडून 26 लाख 30 हजाराची रोकड व 3 हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा असा एकूण 26 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबविला आहे.
तसेच शहरातील बीएड कॉलेज जवळील टाटा इंडीकॅश एटीएम सेंटर देखील चोरट्यांनी फोडल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 241/17 भारतीय दंड संहिता 457, 380, 427 प्रमाणे दाखल केला आहे.
दरम्यान पोलिसांनी ऑरेंज कॉर्नरवरील असलेल्या इतर सीसीटीव्ही कॅमेरेचे चित्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये काही आढळून आले नाही. तर स्टेट बँकेच्या एटीएम मशिन सेंटरच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात मात्र चोरटा कैद झाला आहे. सदर चित्रण बँक अधिकार्‍यांनी पोलिसांना दिले आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकम करत आहे.

स्टेट बँकेच्या एटीएम मशिन सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील चित्रणावरुन असे दिसून येते की सदर घटना ही मंगळवारी पहाटे 2.30 ते 4 या दरम्यान घडली आहे. चोरट्याने प्रथम सेंटरच्या शटरचे कुलूप गॅस कटरच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्याने सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. त्यानंतर मशिन गॅस कटरच्या सहाय्याने तोडून 26 लाख 30 हजार रुपयांची रोकड लांबविली आहे.

सदर ठिकाणी सुरक्षा कर्मचारी नव्हता. बँकेने सदर ठिकाणी एटीएम मशिन उभारण्याबाबत व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस स्टेशनला अधिकृतरित्या कळविलेले नव्हते. तसेच बीएड कॉलेजजवळील टाटा इंडीकॅश एटीएम मशिन देखील चोरट्यांनी फोडले आहे. मात्र तेथून किती रोकड चोरीला गेली हे अद्याप संबंधीत अधिकार्‍यांकडून कळू शकले नाही. घडलेल्या घटनेतील आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहे.
-अशोक थोरात, पोलीस उपअधिक्षक, संगमनेर

चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद – चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद
ऑरेंज कॉर्नरवरील स्टेट बँकेचे एटीएम मशिन सेंटर गॅस कटरच्या सहाय्याने फोडून आत प्रवेश करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. सदर चित्रणामध्ये चोरटा दिसून येत आहे. त्याचे छायाचित्र करून त्याआधारे पोलीस चोरट्याचा शोध घेणार आहेत.

अकोले नाक्यापर्यंत माग –
पोलीस अधिकार्‍यांनी एटीएम सेंटरची पाहणी केली. श्‍वानपथकही दाखल झाले. श्‍वानाने एटीएमपासून सुयोग कॉलनी ते अकोले नाक्यापर्यंत माग दाखविला. कदाचित त्यानंतर चोरट्यांच्या वाहनाने मार्ग बदलला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

*