Type to search

ब्लॉग सार्वमत

Blog: रातोरात लखपती; चोरट्यांचा एटीएम फंडा !

Share

एनी टाईम मनी अर्थात एटीएम मशिनची सुरुवात भारतात सुमारे 1987 च्या दशकात झाली. 24 तास सेवा देणारी ही स्वयंचलित यंत्रणा नागरीकांना फायद्याची ठरली. मात्र तिचे संरक्षण करणे क्रमपात्र ठरते आहे. एटीम मशिनच्या सुरक्षततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म असतांना देखील एटीएम मशिन फोडण्याच्या, पळविण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहे. एटीएम सेंटरची सुरक्षा हा प्रश्न सध्या एैरणीवर आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक बँकांचे एटीएम मशिन फोडले गेले. 24 तास सुरक्षा रक्षक, आपत्कालीन परिस्थितीतले अलार्म, आत आणि बाहेरही सीसीटीव्हीचे जाळे… एटीएम सुरक्षेसाठी असे काटेकोर उपाय बंधनकारक करण्यात आले असतांनाही, अनेक बँकांनी सरकारचे हे आदेश धाब्यावर बसविलेले आहेत. त्यामुळेच लाखो रुपयांची लुट झाली आहे…होत आहे…याला जबाबदार कोण? असा सवाल असतांना त्याचे उत्तर मात्र ना बँकेकडे ना पोलिसांकडे..

गेल्या सहा महिन्यात संगमनेरमध्ये पाच एटीएम मशीन फोडण्याच्या घटना घडल्या. शहरात किती एटीएम मशिन सेंटर आहे, याची यादी पोलिसांकडे नाही. याला कारणीभूत काहीप्रमाणात बँकांचा कारभार देखील आहे. वारंवार सूचना करुन देखील बँकांनी सुरु केलेल्या एटीएम मशिन सेंटरची नोंद ही पोलीस ठाण्यात केलेली नाही. त्यामुळे शहरात किती एटीएम आहेत हे समजणे अवघड आहे. त्यातच बँकांनी सुरु केलेल्या एटीएम सेंटरला सुरक्षा गार्ड नेमलेला नाही. रामभरोसे असलेले सेंटर आणि या सेंटर मध्ये असलेले लाखो रुपये यांना कुठलीही सुरक्षीतता प्रदान केली गेलेली नाही. त्यामुळे एटीएम मशिन फोडण्याच्या अथवा पळविण्याच्या घटना वाढू लागल्या आहे. जिल्ह्यात किती एटीएम मशिन आहेत? याचा आकडा जिल्हा पोलिसांकडे देखील नसेल, हेच या घटनांवरून लक्षात येते.

आत्तापर्यंत संगमनेरातील स्टेट बँक ऑरेंज कॉर्नर, इंडीगो एटीएम बी. एड. कॉलेज रोड, एचडीएफसी बँक ऑरेंज कॉर्नर, कॅनरा बँक मालदाड रोड, बँक ऑफ महाराष्ट्र पुणे-नाशिक हायवे येथील एटीएम मशिन चोरट्यांनी फोडून लाखो रुपये चोरुन नेले. या घटनांचा अद्याप तपास देखील लागलेला नाही. पोलीस यंत्रणा तपास करते आहे, असे नेहमीचे उत्तर मिळते. परप्रांतीय गुन्हेगारांकडून हे गुन्हे होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागलेले नाही. त्यामुळे संगमनेरातील एटीएमची सुरक्षा रामभरोसेच आहे. शनिवारी 22 जून रोजी बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशिन सेंटर चोरट्यांनी फोडून वायररोपच्या सहाय्याने मशिन उचलून वाहनातून लांबविले. सिन्नर तालुक्यातील वावी माळवाडी शिवारात मशिन फोडून त्यातील 17 लाख 18 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काहीच आले नाही. नाशिकच्या दिशेने चोरटे गेल्याचे मशिनचे अवशेष सापडलेल्या ठिकाणाहून लक्षात येते. आता पोलीस त्या दिशेने तपास करत आहे. नाशिक शहरापर्यंत जाणार्‍या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात पोलीस यंत्रणा गुंतली आहे.

या घटनेच्या अगोदर चार दिवस उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी शहरासह तालुक्यातील शासकीय, खासगी बँकांचे अधिकारी यांची बैठक बोलावून त्यांना एटीएम मशिन सेंटर सुरक्षा बाबत सूचीत केले होते. मात्र बँकेच्या अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले दिसते. नागरीकांना 24 तास पैसा उपलब्ध करुन देणारी ही स्वयंचलित यंत्रणा गुन्हेगारांना मात्र रातोरात लखोपती करणारी ठरली आहे. या घटनांना आळा घालायचा असेल तर बँकांना पोलिसांनी सुचवलेल्या सुरक्षा उपायांचा अंमलबजावणी करावी लागेल हे मात्र नक्की..

– गणेश भोर
9623445056

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!