Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रसध्यस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही – मुख्यमंत्री

सध्यस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही – मुख्यमंत्री

डॉक्टर, नर्सेससोबत गैरवर्तन कराल तर खबरदार
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला.राज्यातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत असून आता आपण कोरोनाविरुद्धच्या लढाईच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, असे सांगतानाच पुढील सूचनेपर्यंत राज्यात कोणत्याही धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक आणि इतर सोहळ्यांना परवानगी दिली जाणार नाही. राज्यात कोणताही सोहळा होणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आपली जात, देश, धर्म कुठलाही असो, व्हायरस मात्र एकच आहे. आपण कोरोनासोबत लढा देत आहोत. या लढाईत डॉक्टर, नर्सेससोबत काही विकृती गैरवर्तन करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा विकृतींची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला घरातच थांबण्याचं आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचं आवाहन केलं. कोरोना विरुद्धच्या लढाईच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आलो आहोत. ही लढाई अटीतटीची आहे. त्यामुळे आणखी काळजी घेण्याची गरज आहे. म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील सूचनांपर्यंत राज्यात कोणताही उत्सव, धार्मिक कार्यक्रम, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा होणार नाहीत. अशा कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

गुढीपाडवा, पंढरपूरवारी, रामनवमी आदी सर्व सण आपण घरात साजरे केले. अन्य धर्मियांनीही घरातच सण साजरे करावेत, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. तबलिगींचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात होऊ दिला नाही, मरकजमधून आलेले 100 टक्के लोक विलगीकरण कक्षामध्ये उपचार घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येचं कारण देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात महाराष्ट्रात केसेस वाढत आहेत. आपण चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे ही संख्या वाढते आहे. सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी 51 जण बरे होऊन घरी गेले. यात ज्येष्ठ नागरिक किंवा इतर व्याधी असलेल्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. आपल्या ज्येष्ठ कुटुंबीयांची काळजी घ्यायची आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या