Type to search

Featured मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

भाजपाच्या ‘त्या’ चाळीसमध्ये नगरचे किती?

Share

काहींची धाकधूक वाढली : उमेदवारीसाठी स्पर्धक झाले आक्रमक

अहमदनगर (प्रतिनिधी) – राजकारणात सर्वेक्षणप्रिय पक्ष म्हणून नावारूपास आलेल्या भाजपाने सध्या काही विद्यमान आमदारांची धाकधूक वाढविली आहे. एका सर्वेक्षणानुसार विद्यमान 30 टक्के आमदारांना नारळ देणे गरजेचे आहे, या विचाराप्रत भाजपा नेतृत्व आल्याची चर्चा सातत्याने होते. त्यात नगर जिल्ह्यातील 5 पैकी किती जणांचा आणि कोणाचा नंबर लागणार, याकडे निष्ठावंतांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, काही विद्यमान आमदारांविरोधात स्थानिक स्पर्धक आक्रमक झाले असून या आमदारांच्या ‘कामगिरीचा अहवाल’ वरिष्ठांकडे त्यांनी पोहचविला आहे.

राजकीय इनकमिंगमुळे नेत्यांची गर्दी झाल्याने भाजपाचा आकार सध्या चांगलाच वाढला आहे. आघाडी सरकारमधील अनेक ‘मान्यवर’ नेते भाजपाने पावन करून घेतल्याने पक्षाची ‘पार्टी विथ डिफरन्स’ ही प्रतिमा चांगलीच ठळक झाली आहे. त्यामुळे प्रतिमा संवर्धन आणि आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी भाजपा यावेळी वेगळी खेळी करण्याच्या बेतात आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यानुसार काही विद्यमान आमदारांना घरचा रस्ता दाखविला जाणार, अशी शक्यताही व्यक्त केली जाते. पक्षाच्या एका सर्वेक्षणानुसार काही मतदारसंघात आमदारांनी लावलेले विकासाचे दिवे जनतेला फारसे रूचलेले नाहीत, असे म्हटले जाते.

सोबतच ओरिजिनल अर्थात निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी बाहेरून आलेल्या राजकीय टोळीला किंवा त्या टोळीने निष्ठावंतांना स्वीकारले नाही, असेही दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून निष्ठावंतांनी आता उचल खाल्ली आहे. त्यामुळे पक्षही पेचात आहे. नव्या ‘घाऊक भरती’मुळे वाढलेली अस्वस्थता कमी करण्यासाठी काही विद्यमान आमदारांना घरचा रस्ता दाखवून उमेदवारी बदल केला जाईल, असाही एक तर्क लावला जात आहे.

नगर जिल्ह्यातही काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार, अशी चर्चा काही महिन्यांपासून आहे. या चर्चेला आता ओरिजिनल भाजपाच्या अंतर्गत वर्तुळात धार आली आहे. राज्यात 30 टक्के म्हणजे 40 आमदारांचा पत्ता कट होणार असेल तर प्रमाणानुसार नगरच्या किमान 2 जणांचा आणि कमाल 3 जणांचा नंबर लागू शकतो. त्यामुळे कोणाची ‘टोपी’ उडणार, या प्रश्‍नाचे उत्तर शोधले जात आहे.
………

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या ‘मान्यवर’ नेत्यांनी आपल्यासोबत समर्थकांची फौजही सोबत आणली. त्यांच्या गर्दीने ओरिजिनल भाजपा कार्यकर्त्यांचा श्‍वास कोंडला आहे. आमदारकी पटकावल्यानंतर हे नेते आपल्या चेल्याचपट्यांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि पक्ष संघटनेतही पुढे करतील, अशी भिती अनेकांना वाटते. भाजपाच्या राजकीय दरार्‍यामुळे काही दिवस शांत बसल्यावर यातील काही भाजपाची काँग्रेस तर करणार नाही ना?, अशी भितीही काहींना वाटते.
………..

काँग्रेस-राष्ट्रवादीतील घराणेशाही आणि त्याच त्या चेहर्‍यांना कंटाळून जनतेने या पक्षांना 2014 मध्ये दणका दिला. त्यातील अनेक चेहरे आता भाजपात दाखल झाले आहेत. यंदाच्या घाऊक भरतीत काही सत्तालोलूप उमेदवारीसाठीच भाजपात आले, हे स्पष्ट आहे. त्यामुळे निष्ठावंतांना संधीच न देणे पक्षासाठी योग्य ठरणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे. 2014मध्ये पक्षबदल करून लाटेवर निवडून आलेले आणि 5 वर्षात पक्षवाढीसाठी उपयोगी न पडलेल्यांना घरचा रस्ता दाखवून नव्यांना संधी देत भाकरी फिरवावी, असाही एक सूर ओरिजिनल भाजपात आहे.


विद्यमान आमदारांचा पत्ता का कट होणार, यासाठी काही कारणे ओरिजिनल भाजपाच्या वर्तुळात चर्चेत आहेत. काही आमदारांना ‘संघशिस्त’ फारशी रूचलेली नाही. त्यामुळे त्यांचे संघ कार्यकर्त्यांशी सातत्याने जाहीर खटके उडतात. 2014मध्ये काही दलबदलूंना भाजपाने उमेदवारी दिल्यावर निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांनी या ‘बाहेरच्यांना’ पक्षादेश म्हणून शतप्रतिशत मदत केली. पण त्यांनी निवडून आल्यावर निष्ठावंतांनाच संपवण्याचे उद्योग केल. काहींची पोलीस, कोर्ट आणि जेलशी असलेली दोस्ती या 5 वर्षातही दिसून आली, असे चर्चेतील मुद्दे आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!