Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

प्रचारकर्त्यांनाच मतदारांचा उलट सवाल!

Share

मतदारांचा रोष पाहून कार्यकर्त्यांनी घेतला काढता पाय; गायकवाडवस्ती भागातील घटना

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणूक अवघ्या तीन-चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह उमेदवाराने प्रचाराचा वेग वाढविला आहे. त्यामुळे नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन हात जोडून मताचा ‘जोगवा’ मागितला जात आहे. मात्र पाच वर्षात आम्ही अनेक सुविधांपासून दूर असून निवडणूक आल्यावरच फक्त ‘मतासाठी’ तुम्हांला आमची आठवण होते का?, असा उलट सवाल मतदार प्रचारकर्त्यांना करत आहे. असाच एक अनुभव काल शहरातील गायकवाडवस्ती भागात प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना अनुभवायला मिळाल्याने पक्ष नेत्याबरोबरच कार्यकर्त्यांनी याठिकाणाहून काढता पाय घेणे पसंत केले.

सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरु असून प्रचार कामाला वेग आला आहे. उमेदवार व कार्यकर्ते विविध माध्यमातून प्रचार करताना दिसत आहे. अशाच पध्दतीने काल सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास शहरातील गायकवाडवस्ती भागात प्रचार दौरा दाखल झाला. मतदारांना विकास कामाचे आमिष दाखवून आम्हांला मतदान करा, अशी साद प्रचारकर्त्यांनी मतदारांना घातली. मात्र अनेक वर्षापासून विविध सुविधेपासून कोसोदूर असलेल्या नागरिकांनीही संतप्त भूमिका घेत निवडणूक आल्यावरच नागरिकांच्या भेटीगाठी घ्यायला वेळ मिळतो का? असा प्रश्‍न उपस्थित करत अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला गटारीची समस्या, कचरा उचलण्यास ग्रामपंचायतीची गाडे येत नसल्याने निर्माण झालेली अस्वच्छता यासह विविध प्रलंबित प्रश्‍नांची आठवण करुन दिली. त्यामुळे मतदारांचा रोष पाहून प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी काढता पाय घेतला.

दरम्यान, शहरातील गायकवाडवस्ती परिसर ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे गटारीसह अनेक सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. अशातच प्रचारकर्ते येऊन ठेपल्याने रोषास सामोरे जाण्याची वेळ आली. ही घटना शहरभर पसरताच या भागात इतर पक्ष कार्यकर्ते व उमेदवारांचे येणार्‍या नियोजित दौर्‍यानेही मार्ग बदलल्याचे ऐकावयास मिळाले. त्यामुळे आता मतदारही विकास कामांच्या आश्‍वासनांच्या भुलथापांना बळी न पडता यापूर्वीच्या विकासाच्या मुद्यावर उमेदवार व पक्ष कार्यकर्त्यांना उलट सवाल करु लागले आहे. त्यामुळे आता प्रचार करतानाही मतदारांच्या प्रश्‍नांना उमेदवार व पक्ष कार्यकर्त्यांना सामोरे जाण्याची वेळ आल्याने प्रचारदौरेही चर्चेचे विषय ठरू लागले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!