Monday, April 29, 2024
Homeनगरआश्वी परिसरात चोरट्यांचा धुडगूस

आश्वी परिसरात चोरट्यांचा धुडगूस

शिक्षकासह आठ जणांना दणका

आश्वी (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत आश्वीचे पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहत असलेल्या स्वरुपचंद मार्केटला लक्ष्य करून तीन ठिकाणी जबरी चोर्‍या केल्याची घटना घडली आहे. आश्वी-प्रतापपूर रस्त्यावर दोन ठिकाणी तर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेले दोन बंद बंगले, अशा एकूण आठ ठिकाणी चोर्‍या करून 1 लाख 37 हजारांचा ऐवज चोरून पोबारा केल्याची तक्रार आश्वी पोलीस ठाण्यात सचिन डहाळे यांनी दाखल केली आहे. याबाबतची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

आश्वी बुद्रुक – प्रतापपूर रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर स्वरुपचंद गांधी मार्केट आहे. या मार्केटमध्ये दुसर्‍या मजल्यावर राहत असलेले प्राथमिक शिक्षक सचिन हरिभाऊ डहाळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून 10 हजार रोख व 1 तोळे सोन्याचे दागिने, विकास रामनाथ वर्पे यांचे 5 हजार रोख व 27 हजारांचे सोने व तिसर्‍या मजल्यावर राहत असलेल्या संदीप श्रीरंग क्षीरसागर यांच्या घरातून 55 हजारांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला. चोरट्यांनी आश्वी – प्रतापपूर रस्त्याच्या कडेलाच राहत असलेल्या सुलोचना रमेश पाडंव यांच्या घरातून रोख 30 हजार रुपये व अन्य एका बंद घराचे कुलूप तोडले आहे.

तसेच आश्वी बुद्रुक बाजारतळालगत व पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन ठिकाणी चोरट्यांनी धुडगूस घातला. याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान रविवारी सकाळी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करून घटनास्थळाची पाहणी केली असून सचिन डहाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 134/19 प्रमाणे भारतीय दंड संहिता 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पोलीस अधिकारी वास्तव्यास असलेल्या सोसायटीतच चोर्‍या
यावेळी चोरट्यांनी चोरीला अडथळा होऊ नये यासाठी शेजारील घराच्या बाहेरून कड्या लावून घेतल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. उल्लेखनीय म्हणजे आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे सुध्दा या सोसायटीत वास्तव्यास असल्याने चोरट्यांनी जणू पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या