कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे चार्‍या उकरून द्या

0

युवा नेते आशुतोष काळे यांची अभियंत्यांकडे मागणी

कोपरगाव (प्रतिनिधी) – कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बीसाठी दोन व उन्हाळी तीन आवर्तन देण्याचे त्याचबरोबर शेतीसाठी पाणी देताना मुख्य चार्‍या उकरून देण्याचे ठरले आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी देताना मुख्य चार्‍या उकरूनच सिंचनासाठी पाणी द्यावे अशी मागणी युवा नेते आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नाशिक यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाटबंधारे विभागाला दिलेल्या निवेदनात आशुतोष काळे यांनी म्हटले की, गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार्‍या निर्णयानुसार सिंचनाचे नियोजन करीत असतो. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्य चार्‍या उकरून देण्याचे ठरले असल्यामुळे बहुसंख्य शेतकर्‍यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज भरले आहेत. ज्या शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज भरले आहेत त्या शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी देणे बंधनकारक आहे.

परंतु मागील वेळेस सिंचनासाठी आवर्तन देतांना पाटबंधारे विभागाने मर्यादित क्षेत्रातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी दिले होते. त्यावेळी पाणी कमी असतांना पाण्यापासून शेतकरी वंचित राहिले. आज गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व धरणे तुडुंब भरलेली आहेत. यावर्षी जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडले जाणार नाही, अशी परिस्थिती असताना जर या चार्‍या उकरल्या गेल्या नाहीत तर धरणांमध्ये मुबलक पाणी साठा असताना या शेतकर्‍यांना सात नंबर पाणी मागणी अर्ज भरूनही पाण्यापासून वंचित राहावे लागेल याची पाटबंधारे विभागाने नोंद घ्यावी. धरणे भरलेली असताना शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नये व शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये अशी माझी स्पष्ट भूमिका आहे.

कालव्यांच्या मुख्य चार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे व काटेरी वनस्पती वाढल्यामुळे शेतकर्‍यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार नाही. त्यामुळे साहजिकच शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्य चार्‍या उकरून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी पाटबंधारे विभागाने करावी. सध्या गोदावरी कालव्याचे आवर्तन सुरु झाले असून गोदावरी कालव्यांना सोडण्यात आलेले आवर्तनातून सर्वप्रथम पिण्यासाठी पाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर सिंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास आठ ते दहा दिवसांचा कालावधी जाणार असून या कालावधीत झाडाझुडपांनी व काटेरी वनस्पतींनी वेढलेल्या मुख्य चार्‍या उकरून द्याव्या व काही वितरिकांचे गेट नादुरुस्त असून ते तातडीने दुरुस्त करावे अशी मागणी आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

*