साखरेबाबत द्विस्तरीय दर पद्धतीची गरज : आशुतोष काळे

0

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या 63 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

कोपरगाव (प्रतिनिधी) – साखरेच्या वाढीव दराबद्दल अवास्तव प्रचार, चिंता व टीकाटिप्पणी करून साखरेचे दर नियंत्रित ठेवले जातात. पण त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होते. त्यासाठी शासनाने साखरेचा दर हा घरगुती वापरासाठी एक व औद्योगिक क्षेत्रासाठी वेगळा आकारून द्विस्तरीय दरपद्धती स्वीकारावी, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले.
कर्मवीर काळे कारखान्याचा 63 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. यावेळी बोलताना आशुतोष काळे म्हणाले चालू हंगामात कार्यक्षेत्रातून 3.25 मेट्रिक टन व कार्यक्षेत्रा बाहेरून 2.25 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होऊन 5.50 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असले तरी सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळप होईल.
यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. उसाच्या किमान हमी भावाच्या एफ.आर.पी. प्रमाणेच साखरेला सुद्धा किफायतशीर व हमीभाव निर्धारित करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने अंगीकारली पाहिजे, सदोष व विसंगत धरसोड धोरणामुळे शेती व साखर उद्योगाला सातत्याने अस्थिरतेचा सामना करावा लागत असल्यामुळे साखर उद्योगाला दूरदृष्टीच्या निश्चित धोरणांची आवश्यकता असल्याचे सांगितले. ऊस नियंत्रण मंडळाच्या शिफारशीनुसार ऊसतोडणी वाहतूक खर्चाची कमालमर्यादा निश्चित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
ऊस वाहतुकीच्या अंतरानुसार दर देण्याची पद्धत शासन अवलंबून पाहत आहे. ही सहकाराला पोषक नाही, सहकारी साखर कारखानदारीला मारक असल्याचे सांगत दरवर्षी सहकारी साखर उद्योगापुढे नवनवीन अडचणी येत आहेत. या सर्व अडचणींवर मात करीत कोणत्याच गोष्टीत मागे नसणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना ऊस दराच्या बाबतीतही मागे राहणार नाही अशी ग्वाही दिली.
माजी आमदार अशोकराव काळे म्हणाले 2015 साली भयंकर दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची व पशुधन वाचविण्याची मोठी चिंता होती. त्यामुळे ऊस क्षेत्रात मोठी घट होऊन त्याचा विपरित परिणाम साखर कारखान्याच्या 2016-17 च्या हंगामावर झाला. आपले व्यवस्थापन चांगले असल्यामुळे परतीच्या पावसात गोदावरीला अचानक पाणी सोडले तरीही आपले के.टी.वेअर सुरक्षित राहिले व पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. यावर्षी आवर्तनाची परिस्थिती चांगली राहील.
त्यामुळे जास्तीतजास्त ऊस लागवड करावी. ऊसतोडीची घाई न करता उसाची पूर्णपणे वाढ होऊ द्यावी. त्यामुळे उत्पादनही वाढेल व साखरेची रिकव्हरीही वाढते. सर्व कर्मचारी अधिकारी यांनी खर्चामध्ये काटकसर करून अतिशय कमी खर्चात चांगल्या प्रतीची साखर तयार करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना जास्तीतजास्त मोबदला देता येईल.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, ज्येष्ठ नेते छबूराव आव्हाड, कारभारी जाधव, कारभारी आगवन, नारायण मांजरे, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभापती अनुसया होन, सर्व जिल्हा परिषद सदस्य, संलग्न संस्थांचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी, कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. जे. जगताप, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जे. ए. भिडे,
कारखान्याचे जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, सेक्रेटरी एस. एस. कोल्हे, ऑफिस सुपरिटेडेट बी. बी. सय्यद, चीफ इंजिनियर डी. बी. चव्हाण, शेतकी अधिकारी के. व्ही. कापसे, चीफ केमिस्ट एस. जे. ताकवणे, चीफ अकाउंटट दादा औताडे, इतर पदाधिकार्‍यांसह मोठ्या संख्येने सभासद, शेतकरी व कामगार उपस्थित होते. संचालक अरुणकुमार चंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे यांनी आभार मानले.
  गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत आशुतोष काळे म्हणाले की, केंद्र आणि राज्यात सरकार भाजपचे, लोकप्रतिनिधी भाजपच्या आहे. शासनाने ग्रामीण भागाला विकासासाठी स्वतंत्र पॅकेज दिले पाहिजे. हे गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलणे उचित आहे का? तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी विधानसभेत बोलायचे सोडून भोळ्या भाबड्या शेतकर्‍यांसमोर बोलून खोटा कळवळा दाखवीत आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात विकास करून दाखविला. मागील तीन वर्षात कोपरगाव तालुक्यात विकास झाला नाही, यापुढेही होणार नाही. कोपरगाव तालुक्यात विकास हरवला आहे असे सांगत जनता शासनाच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून  बोलू लागल्याने भविष्यात भाजप सरकारचे काही खरे नाही. त्यामुळे असे वक्तव्य करून भविष्यात होणार्‍या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन वेगळा विचार करून पक्ष बदलायची तर तयारी सुरु केली नाही ना असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

*