Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

विशेष लेख : अर्थाचा अरुणास्त…

Share

पक्षकार्यानिमित्त अरुणजींशी चांगला परिचय होत गेला. त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचे अनेक प्रसंग आले. बैठकांच्या निमित्ताने त्यांच्या कामाची पद्धत परिचित होत गेली. त्याकाळी मर्यादित लोकांची कमिटी असे. त्यामुळे एकमेकांशी वैयक्तिक मित्रत्वाचे, स्नेहाचे संबंध निर्माण होत असत. अशाचप्रकारे अरुणजीशी माझं स्नेहपूर्ण नातं निर्माण झालं. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यातलं ‘राजकीय मार्गदर्शक’ हे स्थान रिक्त झालं आहे.

 

बरोबर एक वर्षापूर्वी अटलबिहारी वाजपेयी, त्यानंतर मनोहर पर्रिकर, त्यानंतर सुषमाजी आणि आता अरुण जेटली… खरं सांगायचं तर काय बोलावं हेच समजत नाही. भारतीय जनता पक्षातले हे रथीमहारथी कोणाचं तरी बोलावणं आल्याप्रमाणे एकापाठोपाठ एक इतक्या तडक निघून गेले आहेत की कोणाचीही मती गुंग व्हावी. 1991 पासून जवळचा संपर्क असणार्‍या सुषमाजींच्या श्रद्धांजली सभेसाठी दिल्लीमध्ये उपस्थित होते त्याच दिवशी अरुणजींना एम्समध्ये दाखल केलं.

सहाजिकच शोकसभा झाल्यानंतर मी एम्समध्ये त्यांना भेटायला गेले आणि जवळपास तीन तास रुग्णालयात थांबले. त्यावेळी पंतप्रधानांसह सगळेच रुग्णालयात होते. पण तेवढ्यात अरुणजींच्या पत्नी आम्हाला भेटल्या आणि अरुणजी उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची सुवार्ता दिली. त्यानंतर सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला आणि आम्ही स्वस्थानी परतलो. मात्र त्यानंतर आठच दिवसात अरुणजी निर्वतल्याची बातमी कानी येणं ही कोणत्याही मोठा आघातापेक्षा कमी क्लेष देणारी बातमी नाही. ही वार्ता ऐकून गतस्मृती दाटून आल्या आहेत.

मी भाजपाची राष्ट्रीय सचिव झाले तेव्हा 9, अशोका रोड येथील अरुणजींच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती. मला पाहिल्याबरोबर त्यांनी मनापासून स्वागत केलं होतं आणि आता राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी सज्ज व्हा, असं म्हणत विश्वासही दर्शवला होता. चांगल्या वक्त्या, अभ्यासक असल्यामुळे तुम्ही चांगलं काम कराल, असं म्हणत त्यांनी मला प्रोत्साहन दिलंच त्याचबरोबर काहीही मदत हवी असल्यास विनासंकोच संपर्क साधण्याविषयीही सूचित केलं. त्यावेळी त्यांनी दाखवलेला विश्वास वेळोवेळी माझ्या कामी आला.

पुढे पक्षाच्या कामानिमित्त अरुणजींशी चांगला परिचय होत गेला. त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचे अनेक प्रसंग आले. बैठकांच्या निमित्ताने त्यांच्या कामाची पद्धत परिचित होत गेली. त्याकाळी कुठलीही कमिटी मर्यादित लोकांची असे. त्यामुळे एकमेकांशी वैयक्तिक मित्रत्वाचे, स्नेहाचे संबंध निर्माण होत असत. नरेंद्र मोदीजी, त्यांचे खरे नामक एक स्नेही, अरुणजी, प्रकाश जावडेकर, मी असा ग्रुप 11, अशोकाच्या डायनिंग रुममध्ये सगळ्यात शेवटी जेवायला असायचा. त्यावेळी मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. गोड पदार्थांवर ताव मारत आणि मोजकं पण समर्पक बोलत अरुणजी त्यात सहभागी व्हायचे.

अरुणजींनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतरही मी बरेचदा त्यांना भेटले. एक अभ्यासू मंत्री असंच मी त्यांचं थोडक्यात वर्णन होऊ शकते. त्यांचं नेतृत्व दूरदृष्टी असणारं होतं. न घाबरता, कोणाचीही पर्वा न करता ते समोरच्या माणसाला काय चूकी आणि काय बरोबर, हे सांगू शकत असत.

सरकार स्थापनेच्या आधी मोदीची, बापू आपटे नामक एक पूर्णवेळ कार्यकर्ते आणि अरुण जेटलीजी हे तीन सख्खे मित्र बरेचदा एकत्र असायचे. त्यांच्या एकत्र असण्यावरुन चिडवलं असता अरुणजी फक्त गालातल्या गालात हसायचे तर बापू, का आमच्या मैत्रीवर जळताय? असं म्हणायचे. इतके सलोख्याचे आणि मित्रत्वाचे संबंध असणारं असं कोणी अचानक निरोप घेऊन गेलं तेव्हा खरोखरच मन विदीर्ण होऊन जातं. सुषमाजींच्या रुपाने मी एक जवळची मैत्रीण गमावली आणि अरुणजींच्या रुपाने एक राजकीय मार्गदर्शक गमावला. ही पोकळी कोणीही भरुन काढू शकणार नाही.

अर्थमंत्री म्हणून अरुणजींची कारकिर्द देशवासियांच्या कायमच लक्षात राहील. त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळातील जीएसटी, नोटाबंदी यासारखे निर्णय अत्यंत निर्णायक ठरले. इतके महत्त्वाचे निर्णय घेतले जातात तेव्हा काही ना काही दुष्परिणाम समोर येतील हे गृहीत धरावंच लागतं. त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागते. हे लक्षात घेऊन पूर्वतयारीनिशी त्यांनी देशाच्या विकासाच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक असे दोन बदल स्वीकारले. पंतप्रधानांनी हा निर्णय जनतेपर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर अरुणजींनीही माध्यमांच्या सर्व प्रश्नांना चोख आणि रोखठोक उत्तरं दिली.

त्याचबरोबर भाजपाच्या सर्व प्रवक्त्यांना दिल्लीला बोलावून घेत प्रवक्ता म्हणून माध्यमांशी याविषयी कसं बोलायला हवं याविषयी आम्हाला गाईडलाईन्स दिल्या. इतकंच नव्हे तर प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी प्रवक्त्यांनी देशातल्या अर्थस्थितीचा अभ्यास करावा, असा त्यांचा सल्ला असे. दोन-तीन दिवस अभ्यास करुन, बजेट नीट ऐकून, त्यातील महत्त्वाचे मुद्दे टिपून घेऊन प्रतिक्रिया कशा द्यायच्या, हे जेटलींजी मला वेळोवेळी सांगितलं आहे. अरुणजी निष्णात वकील होते. त्यामुळे एखाद्या मुद्दा विषद करताना वकिली शिक्षणातलं कौशल्यही त्यांच्या कामी येत असे. मेक इन इंडिया, कौशल्य योजना, मुद्रा योजना अशा सरकारने राबवलेल्या अनेक योजनांविषयी अरुणजी आमच्याशी सविस्तर बोलायचे.

प्रवक्ते म्हणून योजनांचा संदर्भ देताना हे मुद्दे अवश्य मांडा, कोणी याविषयी प्रश्न विचारला असता असं उत्तर द्या इतक्या बारकाईने त्यांनी मला मार्गदर्शन केलं आहे. सध्याच्या युगात इतक्या चोख पद्धतीने काम करणारा नेता खात्रीने पहायला मिळणार नाही. माझ्यासारख्या राष्ट्रीय महिला मोर्चाची अध्यक्ष असणार्‍या महिलेच्या अंगचे गुण ओळखून त्याचं वर्धन होण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन करणारा स्नेही आता कायमचा निघून गेला आहे. केवळ मीच नव्हे तर त्यांनी अनेकांच्या गुणांची पारख करुन उत्थापन देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच मी त्यांना रत्नपारखी म्हणते.

एकदा महिला मोर्चाच्या पदाधिकार्‍यांच्या एका बैठकीमध्ये मी सगळ्या सदस्यांना सांगितलं होतं की, तुमचे पुरुष मित्र वा पती कोणीही आल्यास त्यांना केबीनमध्ये भेटण्यास मज्जाव आहे. सबब त्यांना भेटण्यासाठी सदस्याने उठून बाहेर जावं. पण अन्य महिला सदस्यांच्या कामात व्यत्यय येऊ नये या हेतूने घेतलेल्या या निर्णयाचा माध्यमांनी गहजब केला आणि त्याविरुद्ध तक्रारी नोंदवल्या. मुख्य म्हणजे आक्रमक होत माझ्यावर जोरदार हल्लाबोल केला.

पण त्यावेळी अरुणजी मदतीला धावून आले. ते मीडियाला सामोरे गेले आणि कांताताईंनी बरोबर केलं, असं ठामपणे सांगितलं. महिलांनी शिस्तबद्ध कार्यपद्धती जोपासण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे, असं सांगत तेव्हा त्यांनी माझ्या या निर्णयाची खंबीरपणे पाठराखण केली. मीडियाला सुनावलं. ही घटना मी कधीच विसरु शकणार नाही.

अरुणजी सतत कामात बुडालेले असत पण निवांत असताना मात्र अरुणजींच्या भोवती नेहमी मित्रमंडळींचा गोतावळा असे. पत्रकार रजत शर्मा हे त्यांच्या मित्रवर्यांपैकी एक. त्यांची अगदी घट्ट मैत्री होती. गप्पा मारणं, वादविवाद याबरोबरच चित्रपट पाहणं हे या जोडगोळीचे आवडते छंद होते.

एकदा जेटलीजी, सुषमाजी, अडवाणीजी, व्यंकय्या नायडू यांच्यासह आम्ही काही जणांनी ‘लगान’ एकत्र पाहिला होता. चित्रपटप्रेमी अडवाणीजींनी हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यानुसार अरुणजींनी सगळी व्यवस्था केली होती. त्यानंतर या विषयावर आमच्या बर्‍याच गप्पा रंगल्या. तेव्हा त्यांनी माझ्याशी संवाद साधला होता. पूर्वाश्रमी मी कबड्डीपटू होते तसंच ग्रामीण भागातून आले होते हे ते जाणून होते. त्यावरुन ते ‘तुम्ही आत्मचरित्र लिहायला हवं’ असंही म्हणाले होते. असा प्रेमळ आणि हट्टाने आग्रह धरणारा माणूस आपण गमावला आहे.

अरुणजींची निर्णयक्षमता अफाट होती. विशेषत: देशातल्या महिलांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या योजना अमलात आणल्या पाहिजे, महिलांना त्या योजनांचा फायदा कसा मिळाला पाहिजे यावर ते सखोल विचार करत असत. अटल कौशल्य योजना असो वा बचत गटांना आर्थिक मदत देण्याविषयीचा मुद्दा असो ते तितक्यास अभ्यासूपणे वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करायचे. वृद्धांसाठी लाभकारक असणार्‍या योजना राबवण्याकडेही त्यांचा कटाक्ष असायचा.

मुख्य म्हणजे ग्रामीण भागातून आलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडून ते ग्रामीण भागांमधल्या समस्यांबद्दल जाणून घ्यायचे आणि त्या सोडवण्यासाठी कोणते निर्णय घ्यायला हवे याविषयीदेखील चर्चा करायचे. अशाप्रकारे सगळ्यांशी चर्चा करुन निर्णय घेत असल्यामुळे त्यामध्ये सर्वसमावेशकता येत असे. स्वत:ला मोठं न मानता लहानांकडून जाणून घेण्यासही मोठं मन असावं लागतं जे अरुणजींकडे होतं. म्हणूनच ते वयानं माझ्यापेक्षा लहान असले तरी मानानं खूप मोठे होते.

जेटलीजी मितभाषी होते. चेहर्‍यावर हलकं स्मितहास्य ही त्यांची ओळख होती. ते कोणीशी तावातावाने बोलत नसत. मात्र बोलतील ते अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद असे. फाजिल बोलणं, टवाळी, नसते विनोद यांना त्यांच्या बोलण्यात अजिबात स्थान नसे. या गुणवैशिष्ट्यांमुळेच संसदेतही त्यांच्या बोलण्याचा प्रभाव दिसत असे. असं हे सौम्य आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपल्याचं दु:ख खूप मोठं आहे. अरुणजींना विनम्र आदरांजली.

(- डॉ. कांता नलावडे, लेखिका महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता म्हणून कार्यरत आहेत.)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!