Type to search

Featured maharashtra धुळे फिचर्स

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी

Share

जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या चमूने दिले मोहाडीच्या परवीनला जीवदान

धुळे –

धुळे येथील मोहाडी भागात राहणाऱ्या 36 वर्षीय परवीनला मागील एक वर्षांपासून डाव्या बाजूच्या जबड्याला आजार होता. त्यामुळे अन्नकण चावण्यास तिला प्रचंड त्रास होत. त्यामुळे तिची तब्येतही खालावत होती. जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम दंत महाविद्यालय व मेडिकल महाविद्यालयात तिच्या जबड्याची तपासणी केल्यानंतर या जबड्याला गंभीर आजार असल्यामुळे तो निकामी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर फाउंडेशनच्या निष्णात चमूने तिच्यावर सोमवार दिनांक 16 मार्च 2020 रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करुन डाव्या बाजुला कृत्रिम जबडा बसविला.उत्तर महाराष्ट्रातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया मानली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहाडी येथे राहणाऱ्या 36 वर्षीय परवीन पिंजारी या गृहिणीला मागील वर्षांपासून डाव्या जबड्याचा आजार होता. परवीनचा पती जावेद पिंजारी हा ड्रायव्हर आहे तर आई गृहिणी आहे. त्यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने खाजगी महागड्या हॉस्पिटलमध्ये त्यांना खर्च करणे परवडणारे नव्हते. त्यामुळे हा त्रास अंगावर काढत मागील एक वर्षांपासून परविन कंटाळली होती. तिला अन्न चावताना प्रचंड वेदना होत असत. नातेवाईकांच्या तसेच गावातील नागरिकांच्या माहितीतून परवीन जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम दंतवैद्यकीय महाविद्यालयाच्या संपर्कात आली.

तिथे तपासणी झाल्यानंतर एसिपीएम मेडिकल कॉलेजमध्ये तिच्या जबड्याची पुन्हा तपासणी करण्यात आली. तिथे विविध तपासण्या तसेच अतिसूक्ष्म निदान केल्यानंतर आजारामुळे 36 वर्षीय परविनचा डावा जबडा पूर्णपणे निकामी झाल्याची बाब लक्षात आली. शेवटी महाविद्यालयातील निष्णात सर्जन डॉ. बी. एम.रुडगी यांनी हा डावा जबडा बदलण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला परविनला दिला. त्यानंतर परवीनच्या कुटुंबियांशी चर्चा करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. सोमवार दिनांक 16 मार्च 2020 रोजी 36 वर्षीय परविन वर यशस्वी रित्या शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात तिच्या डाव्या बाजूचा अर्थात TMJ JOINT हा कृत्रिमरित्या बसविण्यात आला.


ही शस्त्रक्रिया प्रसिद्ध डेंटल सर्जन डॉ. बी.एम.रुडगी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. रेश्मा हम्मनवर, डॉ. सोनाली फुलझेले, डॉ.आरिफ, डॉ. धीरज, डॉ. गौरव, डॉ. रिषभ, डॉ. जॉर्जिना व चमू यांनी यशस्वीरित्या केली. त्यांना महाविद्यालयातील निष्णात भूलतज्ज्ञ डॉ. संजय गद्रे, डॉ. मनोजकुमार कोल्हे डॉ.मानसी पानट, डॉ.प्रणाली शुक्ला, डॉ.सायली म्हाबडी व चमू यांचेही विशेष सहकार्य मिळाले.
ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सदर चमूला फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. भाईदास पाटील, व्हाईस चेअरमन तथा आमदार कुणाल पाटील, डॉ. ममता पाटील सहसचिव संगीता पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, उप अधिष्ठाता डॉ.आरती कर्णिक- महाले, दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण दोडामनी आदींचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!