Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedकोरोनानंतर आता झोनोसिस

कोरोनानंतर आता झोनोसिस

प्रा.डॉ.पी.एस.लोहार
9423936543

झोनोसिस म्हणजे माणसाकडून प्राण्यांना होणारा संसर्ग किंवा प्राण्यांमार्फत मानवास होणारे आजार होय. नुकतेच न्यूयॉर्क शहरातील ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयात 4 वर्ष वय असलेल्या नादिया नावाच्या वाघिणीस नोव्हेल कोरोना व्हॉयरसचा संसर्ग तेथील प्राण्यांची काळजी घेणार्‍या व्यक्तीकडून झाल्याचे वैद्यकीय तपासणी अंती निष्पन्न झाले आहे. मानवामुळे प्राण्यांना कोव्हिड -18 चा संसर्ग होतो हे दर्शवणारी ही जगातील झोनोसीसची पहिली घटना आहे.

प्राण्यांच्या माध्यमातून मानवास प्लेग, डेंगू, मलेरिया, बर्ड फ्लू व स्वाईन फ्ल्यू या सारख्या अनेक जीवघेण्या रोगांची लागण झालेली आहे.कोरोना व्हॉयरस हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हॉयरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यात गायींना व डुकरांना होणार्‍या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणार्‍या श्वसन रोगाचा समावेश आहे. या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो.
ह्याचा संसर्ग मनुष्यजातीस किती प्राणघातक आहे हे आज मितीस जागतिक स्तरावरील कोव्हिड-19 मुळे मृत झालेल्या आकडेवारीवरून लक्षात येते. व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस अजूनतरी उपलब्ध नाहीत. कोरोना व्हायरस प्रथम 1960 च्या दशकात सापडला आहे. सर्वात आधी सापडलेल्यांमध्ये कोंबड्यांमध्ये एक संसर्गजन्य ब्रॉन्कायटीस विषाणू आणि सामान्य सर्दी असलेल्या दोन रुग्णांमध्ये (ज्यांना नंतर ह्यूमन कोरोनाव्हायरस 22 ए ई आणि ह्यूमन कोरोनाव्हायरस ओसी 43 असे नाव देण्यात आले) होते.

- Advertisement -

2003 मध्ये सार्स-सीओव्ही, एचसीओव्ही एनएल 2004 मध्ये एचकेयू 1, 2019 मध्ये मेर्स-सीओव्ही आणि डिसेंम्बर 2019 मधील-नोव्हेल कोरोना व्हायरस म्हणून ओळखले जाणारे आता एसएआरएस-कोव्ही -2 या कुटुंबातील अन्य सदस्यांची ओळख पटली आहे. याद्वारे गंभीर श्वसनमार्गाचे संक्रमण होते. मानवाच्या गरजा अमर्याद आहेत. त्यापूर्ण करणेसाठी मनुष्य गायी, म्हशी, बकर्‍या, मेंढ्या, घोडे, डुकरे, कोंबड्या, इमू, शहामृग, मासे, मधमाश्या, रेशीम किडे या यासारख्या अनेक प्राण्यांचे पालन व संगोपन करू लागला. करमणुकीसाठी कुत्रे, मांजर, कबुतर,पोपट, गरुड तर काही देशात बिबटे किंवा वाघ इत्यादी प्राणी पाळू लागलेत.

या प्राणांच्या शरीरावर किंवा त्यांच्या अवतीभवती वावरणार्‍या असंख्य कीटक, कृमी,परोपजीवी प्राणी तसेच बुरशी, जिवाणू व विषाणू या सूक्ष्मजीवांचा संपर्क मानवास झाला. त्यायोगे एकमेकांच्या सान्निध्यात राहिल्याने व आरोग्याचे योग्य ती काळजी न घेतल्याने आजारांचे प्रकार व संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत गेली. देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या व त्यामुळे मृत होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.स्थानिक प्रशासन, राज्य व केंद्र सरकार परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सतत उपाययोजना राबवित आहेत.त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 22 मार्च पासून देशात लॉकडाऊन देशात केल्यामुळे परिवारासह घरीच राहून कोव्हिड-19 चा प्रसार कमी करण्यास मदत होत आहे. अशा परिस्थितीत जर आपल्याकडे पाळीव प्राणी किंवा पशुपालनाचा व्यवसायातील प्राण्यांशी संपर्क येत असेल तर सावध राहण्याची गरज आहे.

कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीने प्राण्यांशी संपर्क टाळावा. जर त्यांना हाताळायची वेळच आली तर योग्य हातमोजे व चेहर्‍यावर मास्क लावूनच त्यांच्या जवळ जावे. प्राण्यांशी संपर्कात आल्यास आपण खाणे, पिणे तसेच आपल्या नाकाला, तोंडाला व डोळ्यांना हात लावू नये. प्राण्यांचा चावा किंवा ओरबडणे यापासून आपले संरक्षण करावे.

प्राण्यांना कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास व अतिसाराचे लक्षणे दिसत असतील तर पशुवैद्यकामार्फत तपासणी व लसीकरणासह उपचार करून घेणे गरजेचे आहे. पशु किंवा पक्ष्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढेल यासाठी औषधी द्यावीत. आजारी प्राण्यांचे विलगिकरण करणे अतिमहत्त्वाचे ठरेल. गोठा,तबेला, कुक्कुटपालनाची जागा व आपला परिसर कीटक नाशकांचा वापर करून निर्जंतुकीकरण केला पाहीजे. अशा प्रभावी उपाय योजनांच्या माध्यमातून व संयशिस्तीतून आपण कोरोनाच्या संकटात झोनोसिस पासून आपले व प्राण्यांचे रक्षण करू शकतो.
प्राणीशास्त्राचे प्राध्यापक, चोपडा

- Advertisment -

ताज्या बातम्या