Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedयुगनायक महात्मा जोतीराव फुले

युगनायक महात्मा जोतीराव फुले

मीरा भगवान जंगले-पाटील
मो. 8605877724

 जिल्हाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड, जळगाव

महाराष्ट्रातील महान समाजसुधारक, भारतीय इतिहासात मुलींसाठी शाळा स्थापन करणारे पहिले भारतीय म्हणून स्त्री शिक्षणाचे जनक, अस्पृश्यांचे, बहुजनांचे कैवारी, शेतकरी व कामकरी यांचे दुःख व दारिद्रय निवारणासाठी चळवळ उभारणारे पहिले पुढारी म्हणजे महात्मा जोतीराव फुले. सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून समान वागणूक मिळावी, यासाठी जोतीरावांनी आयुष्यभर वैचारिक, सामाजिक प्रबोधन केले. सर्व धर्माचे माहेर सत्य आहे व जगामधील सर्व सुख सत्याने मिळणार आहे, हा संदेश जोतीरावांनी त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात दिला आहे.

सत्य सर्वांचे आदी घर! सर्व धर्माचे माहेर!
जगामाजी सुख सारे ! खास सत्याचे ती पोरें!

सत्यशोधक जोतीराव फुलेंनी अनेक समाज सुधारणा केल्या. बहुजनांच्या दुःखाचे, दारिद्रयाचे आणि मानसिक गुलामगिरीचे मूळ अविद्येत आहे. हे सगळे अनर्थ अविद्येने होत आहे म्हणून जोतीराव फुलेंनी ओळखले. भारतीय इतिहासात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची सुरुवात जोतीरावांनी केली. जोतीरावांनी इ. स. 1848मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली. सावित्रीबाई फुलेंना शिकवून पहिल्या भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका, समाजसेविका व कवयित्री घडवल्या. त्यांना सतत समाजसुधारणेसाठी प्रेरणा व मार्गदर्शन जोतीरावांनी केले. स्त्री कर्तृत्वाला कसा वाव दिला पाहिजे, याचे जगातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सावित्रीबाई व जोतीराव फुले होत. तसेच जोतीरावांच्या सत्यशोधक चळवळीमधूनच पुढे आलेल्या ताराबाई शिंदे यांनी 1882 साली स्त्री -पुरुष तुलना हा दर्जेदार ग्रंथ लिहिला. स्त्री -पुरुष समतेची कणखर भूमिका या ग्रंथात त्यांनी मांडली.

- Advertisement -

जोतीराव फुले यांचे शिक्षणक्षेत्रातील कार्य मोलाचे आहे. जे आजही मार्गदर्शक व आदर्श आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 यानुसार प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले. मात्र, या संदर्भात 1882 मध्ये जोतीराव फुलेंनी हंटर शिक्षण आयोगापुढे निवेदन सादर केले होते. किमान 12 वर्षे वयापर्यंतच्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले जावे, ही मागणी करणारे जोतीराव हे पहिले भारतीय होत. प्राथमिक शाळांची संख्या वाढवावी, प्रांतिक सरकारांनी भरघोस अनुदान द्यावे, प्राथमिक शाळांचा कारभार शिक्षण खात्याच्या देखरेखीखाली चालावा, प्राथमिक शाळांतील शिक्षक कनिष्ठ वर्गातील व प्रशिक्षित असावा, अशा महत्त्वाच्या बाबी त्यांनी मांडल्या. याचबरोबर खेडयातील मुलांना शेतकीचे आणि तांत्रिक शिक्षण द्यावे, शेतकीच्या प्रत्यक्ष शिक्षणासाठी आदर्श शेताची योजना आखावी व मातृभाषा, हिंदी आणि इंग्रजी असा त्रिभाषा सूत्राचा विचारही जोतीरावांनी सुचविला होता. यावरून त्यांची महान दूरदृष्टी दिसून येते. आपल्या अखंड काव्यरचनेत जोतीराव लिहितात-
तीन भाषेंमध्ये सध्या जे निपूण! सद्गुणी संपन्न! मानवंत !

बहुजन समाजातील, खेड्यापाड्यातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी जोतीरावांनी शाळा काढल्या व अध्यापनाचे कार्य सुरु ठेवले. जोतीरावांनी खालच्या वर्गापासून शिक्षणाचा प्रारंभ केला होता. हीच खरी स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात होती. यामुळेच जोतीराव फुले यांचे शिक्षण प्रसार कार्य बघून सरकारी विद्या खात्याकडून त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले होते. सन 1852मध्ये पुणे येथे विश्रामबागवाडयात पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते दोन शाली (किंमत 193) देऊन जोतीरावांचा सत्कार करण्यात आला होता आणि या सत्कार समारंभाला बरीच गर्दी होती.

तत्कालीन समाजव्यवस्थेत बहुपत्नीत्व, बालविवाह, केशवपन, अस्पृश्यता, जातीभेद, अनिष्ठ चालीरीती होत्या. याविरुद्ध सर्वप्रथम कार्य केले ते जोतीराव फुले यांनी. जोतीराव फुले यांना एकच पत्नी होत्या सावित्रीबाई फुले. जोतीरावांना स्वतःचे मूलबाळ नव्हते तरी त्यांनी दुसरे लग्न केले नाही. बालविवाहाबाबत समाजात जागृती केली. त्याकाळात जोतीरावांनी बालहत्या प्रतिबंधकगृहाची व्यवस्था केली होती. त्यामुळे बालविधवांनी या गृहात गुपचुप बाळंतपण आटोपून स्वतःची व कुटुंबाची अब्रू वाचविली. महार, मांग अस्पृश्य समाजावर खूप अन्याय होता. पाण्यासाठी त्यांना खूप त्रास व्हायचा म्हणून जोतीरावांनी आपल्या घरचा पाण्याचा हौद (छोटी विहीर) खुला केला. यात सर्वसुधारणा करणारे जोतीराव पहिले भारतीय होते. जोतीरावांच्या अनेक सुधारणा आजच्या समाजाने स्वीकारल्या आहे. स्त्रीशिक्षण आज सर्व मुलींना मिळत आहे. समाजात बालहत्या प्रतिबंधगृह आहे. बालविवाह बर्‍याच प्रमाणात कमी आहे. विधवा पुनर्विवाह होत आहे. भारतीय संविधानामुळे आज आपणाला न्याय, समता व स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. समता व मानवता याविषयी जोतीराव फुले लिहितात- निर्मिकें निर्मिला मानव पवित्र! कमी जास्त सूत्र! बुद्धीमध्यें !

जोतीराव फुले यांनी अनेक पुस्तके लिहिली. यातून त्यांचे महात्म्य समजून येते. गुलामगिरी या पुस्तकात जोतीरावांनी गुलामांचे, बहुजन समाजाच्या दुःखाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे, यावर विचार करावा आणि त्यातून बाहेर पडण्याचे उपाय सांगितले आहे. ब्राह्मणांचे कसब, सत्सार (अंक 1 व 2), शेतकर्‍यांचा आसूड, इशारा यासारखी ग्रंथसंपदा तसेच हंटर शिक्षण आयोगापुढे निवेदन, अखंडादी काव्यरचना इ . साहित्य रचना त्यांनी लिहिली.

सन 1869 मध्ये शिवजन्म उत्सव साजरा करावा म्हणून जोतीराव रायगडावर गेले. 2-3 दिवस घाणेरी व जंगली झुडुपे कुर्‍हाडीने तोडीत रस्ता काढीत शिवसमाधीचा शोध घेतला. समाधीवरील सर्व कचरा धुवून काढून त्यावर फुले वाहिली व पुणे येथे 19 फेब्रुवारी 1869 मध्ये पहिली शिवजयंती जोतीरावांनी साजरी केली.

शिवजयंती उत्सवाचे जनक जोतीराव फुले आहेत. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या पोवाड्यामध्ये शिवरायांचे गुणगौरव 1000 ओळींमध्ये जोतीरावांनी मांडले आहे.सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात जोतीरावांनी आधुनिक मानवी स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व ही तत्त्वे मांडली. सत्यवर्तन करण्यासाठी त्यांनी 33 सदाचार सांगितले. सर्व मानवांना सत्याचे पूर्ण स्वरूप समजावे म्हणून अतिशय शारीरिक त्रास सहन करून जोतीरावांनी हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक जोतीरावांनी अर्धांगाचा झटका आल्यानंतर उजवा हात लुळा झाल्यावर, शरीरातील व्यथा सहन करीत, डाव्या हाताने लिहून पूर्ण केले आहे. जोतीरावांच्या विश्वकुटुंबवादाचा व भारतीय लोकशाहीचा सार्वजनिक सत्यधर्म हा जाहीरनामा आहे.
सन 1873 मध्ये पुणे येथे जोतीरावांनी मुंबई, पुणे येथील कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. तेव्हा चर्चा करून सत्यशोधक समाजाची स्थापना केली गेली. या बैठकीला 60 कार्यकर्ते उपस्थित होते. जोतीराव फुले हे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. शुद्रतीशुद्रांना जागृत करणे आणि त्यांची गुलामगिरीतून मुक्तता करणे हा सत्यशोधक समाजाचा मुख्य हेतू होता. जोतीरावांनी या माध्यमातून मोठ्या संख्येने बहुजन समाज संघटित करून जागृत केला होता.

जोतीराव फुले हे कर्ते सुधारक होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी संघर्ष करून गोरगरीब, दुःखी-कष्टी लोकांच्या जीवनातील अंधार दूर करून त्यांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत पेटविली. बहुजनांच्या हृदयात जोतीरावांनी आदरांचे स्थान निर्माण केले होते व आजही ते कायम आहे व यापुढेही जोतीराव फुले सर्वांचे आदरस्थानी व आदर्श राहतील. 11 मे 1888 रोजी मुंबईत मांडवी येथील कोळीवाडा सभागृहात जोतीरावांचा सत्कार सर्व समाजबांधवांनी केला. जोतीरावांना महात्मा ही पदवी देण्यात आली. या प्रसंगी प्रचंड गर्दी जमली होती. महात्मा गांधींनी ही जोतीराव फुले यांचा खरा महात्मा म्हणून गौरव केला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्ध व संत कबीर यांच्याबरोबर जोतीराव फुले यांना आपले गुरू मानले होते, यातच जोतीराव फुले यांची महानता दिसून येते .

जगाच्या कल्याणा देह कष्टवावा!
कारणीं लावावा! सत्यासाठी!
अशा वर्तनाने जन्माचें सार्थक!
संतोषी निर्मिक! जोती म्हणे!

11 एप्रिल महात्मा जोतीराव फुले जयंतीनिमित्त सर्व समाज बांधव व शिक्षक बंधू-भगिनी यांनी त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या विचारांचा वसा व वारसा सुरु ठेवूया. व खर्‍या अर्थाने एक दिवस जयंती साजरी करण्यासोबतच दररोज कार्य करूया. सर्वांना महात्मा जोतीराव फुले जयंतीनिमित्त शुभेच्छा!

- Advertisment -

ताज्या बातम्या