Type to search

फिचर्स संपादकीय

बनूया जरासे ‘गंभीर ’!

Share

मोबाईल फोनशिवाय थोडा वेळही राहता येत नाही, अशी अनेकांची परिस्थिती बनली असून शास्त्रीय भाषेत तो एक आजार आहे. असे असंख्य शारीरिक आणि मानसिक आजार मोबाईल फोनमुळे वाढत चालले आहेत.

योगेश मिश्र

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून आऊटलूक या ख्यातनाम नियतकालिकाचे उत्तर प्रदेशप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.)

 

महाविद्यालयांत शिकणारे विद्यार्थी दिवसातून 150 पेक्षा अधिक वेळा आपला मोबाईल फोन पाहतात. 23 टक्के विद्यार्थी दिवसाकाठी आठ तासांपेक्षा अधिक काळ मोबाईल फोनमध्येच व्यस्त असतात. दररोज तीन तास किंवा त्याहून कमी वेळ मोबाईलचा वापर करणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण अवघे 14 टक्के आहे. दररोज चार ते सात तास यादरम्यान वेळ मोबाईलमध्ये घालवणारे विद्यार्थी सर्वाधिक म्हणजे 63 टक्के आहेत. अलिगड मुस्लीम विद्यापीठ आणि भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेतर्फे देशातील वीस केंद्रीय विद्यापीठांच्या आवारात केलेल्या सर्वेक्षणातून निघालेले हे निष्कर्ष आहेत. ‘स्मार्टफोन डिपेन्डन्सी ः हेडोनिजम अ‍ॅण्ड पर्चेस बिहेविअर फॉर डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह’ या शीर्षकाखाली या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

संचार क्रांतीमुळे आपले जग बदलले हे मान्य करावे लागेल; पण या क्रांतीमुळे आलेल्या वाईट गोष्टीच आपण सर्वाधिक स्वीकारल्या आणि त्यांचे गुलाम झालो. मोबाईल फोनमधून निघणार्‍या किरणोत्सर्गामुळे पचनशक्ती कमकुवत होते. झोपेचे प्रमाण कमी होते. किरणोत्सर्गाचा गर्भातील कोवळ्या जिवांवरही प्रतिकूल परिणाम होतो. त्याचप्रमाणे ताज्या संशोधनात असेही दिसून आले आहे की, दररोज पाच तासांपेक्षा अधिक काळ मोबाईलचा वापर करणार्‍या विद्यार्थ्यांना स्थूलतेचा आजार जडण्याची शक्यता 43 टक्क्यांनी अधिक असते. स्थूलतेमुळे हृदयविकार, अकाली मृत्यू, मधुमेह आणि कर्करोगाचाही धोका वाढत चालला आहे. विद्यार्थ्यांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात 700 मुली आणि 360 मुलांचा समावेश करण्यात आला होता.

दुसरीकडे कॅलिफोर्निया विद्यापीठात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, व्हायब्रेशन मोडवर मोबाईलचा वापर जास्त केल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. मोबाईलमधून निघणार्‍या विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गामुळे मेंदूतील पेशींच्या वाढीवरही दुष्परिणाम होतो आणि त्यामुळे ट्यूमरचा धोका वाढतो. मोबाईलमुळे शरीरातील पाणी शोषून घेतले जाते. मेंदूत द्रवरूप घटक अधिक प्रमाणात असतात. मोबाईलचा अधिक वापर केल्यास मेंदूतील द्रवाचे प्रमाण असंतुलित होते. वीर्याच्या प्रमाणातही 3 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.

मोबाईलमधील रेडिओ लहरींमुळे डीएनए नष्ट होण्याचा धोका असतो. मोबाईलचा अधिक वापर केल्यास चुंबकीय क्षेत्राच्या फ्री रेडिकलच्या संख्येत वाढ होते आणि त्यामुळे जैविक प्रणाली बाधित होते.
मोबाईलमुळे ‘फोमो’ नावाचा आजार जडू शकतो. ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट’चे हे संक्षिप्त रूप आहे. 2014 मध्ये सर्वप्रथम या आजाराची नोंद करण्यात आली. एवढेच नव्हे तर मोबाईलचा अतिवापर करणारे
‘नोमोफोबिया’ या आजारालाही बळी पडू शकतात. नोमोफोबियावर झालेल्या संशोधनानुसार, 77 टक्के लोकांना मोबाईलविना थोडा वेळ व्यतीत करणेही जड जाते. 75 टक्के लोक बाथरूममध्येही मोबाईल घेऊन जातात. 46 टक्के लोक मोबाईलसाठी पासवर्डचा वापर करतात. मोबाईल वापरणार्‍यांपैकी 50 टक्के लोक त्यांच्या फोनमधील एसएमएस, एमएमएस अन्य कुणी वाचताच तणावाखाली येतात, असे दिसून आले. 18 ते 24 वयोगटातील निम्म्या लोकसंख्येचे असे म्हणणे आहे की, मोबाईलमुळे त्यांना सतत एक प्रकारचा थकवा जाणवतो. शास्त्रज्ञ त्याला ‘टेक्नोे’रन्स असे नाव देतात. या थकव्याचा आजार जडलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचप्रमाणे मानवी नात्यांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, असेही विविध सर्वेक्षणांमधून दिसून आले आहे.

मोबाईलमुळे होणार्‍या आजारांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमधून स्वतंत्र विभाग सुरू करावे लागले आहेत. लखनौ येथील किंग जॉर्ज विद्यापीठातील या नव्या विभागात सुमारे दोनशे रुग्ण दररोज येतात. कर्करोग विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी कर्करोगाचे रुग्ण अगदीच मोजके असत. अनेक दिवस कर्करोगाचे रुग्ण आढळलेच नाहीत, असा कालावधी पाहायला मिळत असे. आता कर्करोगाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात पोहोचलेले शेकडो रुग्ण दररोज नव्याने भर्ती होतात. अशा टप्प्यांवरील रुग्णांना औषधांच्या सहाय्याने बरे करणे केवळ अशक्य असते. शल्यक्रियाच करावी लागते. गेल्या वीस वर्षांत कर्करोगाचा फैलाव किती वाढला आहे तसेच
मोबाईलमुळे निर्माण झालेल्या आजारांचे रुग्ण दिवसागणिक किती वाढत चालले आहेत याकडे आतातरी डोळसपणे पाहायलाच हवे आणि मोबाईल हा वरदान आहे की शाप, याचा गांभीर्याने विचार करायलाच पाहिजे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!