Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedशेतात बारी देणार्‍यांचे नाईट लाईफ बंद होईल का…?

शेतात बारी देणार्‍यांचे नाईट लाईफ बंद होईल का…?

पुरुषोत्तम गड्डम,-

भ्रमणध्वनी – 9545465455

विराट सतरा करोडात गेला,
धोनी पंधरा करोडात गेला
जगचा पोशिंदा मात्र
झाडावर लटकून मेला…

…या चार ओळींमध्ये महाराष्ट्रातील फार्मर लाईफ बंदिस्त झाले आहे. मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्यासाठी गतीमान बनलेले सरकार, कास्तकारांच्या शेतात लाईट देण्यास मतीमंद बनले आहे. मुंबईत नाईट लाईफचा विचार करता हे ठिक आहे. शेतकर्‍यांचा त्यालाही विरोध नाही. मात्र शेतकर्‍यांना शेतात पाणी देण्यासाठी दिवसा लाईट मिळत नाही, रात्री अंधारात चाचपडत शेतकर्‍यांना शेतात पाणी द्यावे लागत असल्याने आता शेतात अपघातातून मरणार्‍या शेतकर्‍यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

- Advertisement -

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील विजय श्रीवंत ढवस (वय 48), नाशिक जिल्ह्यातील भाऊसाहेब जाधव, तुळजापूर तालुक्यातील सांगवी येथील रंगनाथ एकनाथ भुईस्कर… या शेतकर्‍यांचा रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देतांना विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. तर नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील तीन शेतकर्‍यांना रात्री पिकांना पाणी देतांना सर्पदंश झाला व त्यांचा जागीच मृत्यू झाला… ही आकडेवारी गेल्या काही दिवसांपूर्वीच्या वर्तमानपत्रातून निदर्शनास आली आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी (बारी) देतांना शेतकरी मोठी जोखीम पत्करतात. चक्क अनवाणी पायांनी शेतात उतरुन बारी देण्याचे काम शेतकर्‍यांना करावे लागत आहे. यंदा पावसाळा मनसोक्त झाल्याने शेतशिवारातील विहिरी व ट्यूबवेल काठोकाठ भरल्या गेल्या आहेत. परिणामी गहू, मका, हरबरा व तत्सम पिकांची लागवड शेतकर्‍यांनी करुन घेतली आहे. मात्र पाणी असूनही पाणी देता येत नसल्याची स्थिती आहे. शेतशिवारात दिवसभरात भारनियमन होत असल्याने वीज मिळत नाही. केवळ आठवड्यातून दोन-तीन दिवस सकाळी 9.30 ते 5.30 दरम्यान वीज मिळते व इतर दिवसात वीज पुरवठा खंडीत असतो. मात्र रात्रभर वीज प्रवाह सुरु राहात असल्याने शेतकर्‍यांना शेतातील पिकांना पाणी देणेकामी रात्री शेतात जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकर्‍यांना हे शेतातील नाईट लाईफ जगावे लागत आहे आणि या प्रकारामुळे शेतकर्‍यांचा मात्र हकनाक बळी जात आहे.

रात्री बांधावर जाऊन बघा !

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत आताचे मुख्यमंत्री थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन धडकले होते. शेतकर्‍यांच्या व्यथा शेतावर जाऊन त्यांनी जाणून घेतल्या खर्‍या, पण त्या व्यथांचे परिमार्जन करण्यासाठी मनापासून प्रयत्न होतांना दिसत नाहीत. एकीकडे शासन म्हणत आहे की, राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतकर्‍यांना पिकांना पाणी देतांना होत असलेला त्रास लक्षात घेता, ऊर्जा विभागाने कृषीपंपांना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. पण हे नियोजन होणार तरी कधी….? हंगाम संपल्यानंतर?

शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा जर प्रमुख घटक असेल तर, त्याच शेतकर्‍यांसाठी 24 तास वीज पुरविण्यात सरकार सक्षम का नाही? महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची जीवघेणी दुरावस्था सरकारला ठाऊक आहे. लागोपाठ तोट्यात राहणारी शेती ही शेतकर्‍यांच्या आत्महत्येस कारणीभूत आहे. सरकारचे व समाजाचे लक्ष या हृदयद्रावक प्रकाराकडे असणे आवश्यक आहे. शेतकरी आत्महत्येची दखल घेणे आवश्यक तर आहेच पण कमी उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकर्‍यांना उपासमार सहन करावी लागते. कुपोषणासारखे प्रकार वाढलेत. उत्पादन होत नसल्याने मुलांची शिक्षणातून गळती तसेच इतर दुष्परिणाम वाढतात. हे दुष्परिणाम महाराष्ट्रातील शेतकरी निमुटपणे सहन करित आहे आणि असहायपणे जगत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः फार मोठ्या कोरडवाहू व कमी सिंचन असलेल्या भागात शेती उत्पन्नामधील वारंवार होणारे चढउतार, योग्य कृषीधोरणांचा अभाव, तसेच ते असलेल्या उपाययोजना राबविण्याची सरकारची असमर्थतता हे सारेच शेतकर्‍यांच्या गरिबीला कारणीभूत आहेत. म्हणून नुसते शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकरी दुःख कळणार नाही. त्यासाठी शेतीविषयक सुविधा शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत पोचल्या पाहिजेत.

जखम मांडीला अन मलमपट्टी शेंडीला…!

2011च्या जनगणणेनुसार महाराष्ट्रातील जवळपास 55 टक्के जनता ग्रामीण भागात वास्तव्यास आहे. या ग्रामीण लोकसंख्येच्या उदरनिर्वाहाची चार साधने आहेत. शेती, शेतीपूरक व्यवसाय, मजूरी, रोजंदारी आणि नियमित वेतनधारी नोकर्‍या! त्यातही 44 टक्के कुटुंबाचा व्यवसाय शेती आहे असे असूनही आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेतून शेती विषय शिकवला जात नाही. आजही शेतकर्‍यांच्या पेारांना शेती विषयाचे ज्ञान त्यांच्या बांधावर खपणार्‍या माय-बापाकडूनच घ्यावे लागत आहे.

देशातील पन्नास टक्केवर घटक जर शेतीप्रधान असेल तर त्या संदर्भातील शिक्षण व्यवस्था निर्माण करण आपले कर्तव्य नव्हे काय? पण राजकारणी याकडे मुद्दामहून दुर्लक्ष करतात. ज्या शेतकर्‍यांना वेळेवर अल्पदरात दर्जेदार बियाणे मिळाले. त्यांना आवश्यक ती खते मिळत गेली. पाणी, वीज आणि उत्पादन मिळाल्यानंतर शेतमालास योग्य भाव मिळाला तर शेतकर्‍यास सरकारपुढे हात पसरण्याची गरज राहणार नाही. कर्जमुक्तीच्या कुबड्यांचीही त्याला गरज नसेल. अशी परिस्थिती सार्‍यांनाच ठाऊक आहे. मग सरकारला ठाऊक नसेल काय? पण ‘जखम मांडीला अन मलमपट्टी शेंडीला!’ करण्याची सवय प्रत्येक सरकारला झाली आहे.

शेतकरी आजही तसाच…!

सन 2018मध्ये नवी दिल्ली येथील सेंटर फार द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सी.एस.डी.एस.) या संस्थेने देशातील 18 राज्यांच्या 137 जिल्ह्यातून 234 खेड्यांमध्ये सर्व्हेक्षण केले. त्याचा अहवाल ‘लोकनिती’ या स्वयंसेवी संस्थेने प्रकाशित केला. या अहवालातील स्थिती पाहिली तर शेतकरी आजही तसाच मागास आहे. हे लक्षात आल्याशिवाय राहात नाहीत. लोकनितीतील अहवालानुसार आजही 36 टक्के शेतकरी झोपड्यांमध्ये किंवा कच्च्या विटांच्या घरामध्ये राहतात. केवळ 18 टक्के शेतकर्‍यांकडे पक्की घरे आहेत. 28 टक्के शेतकरी अशिक्षित आहेत. 14 टक्के शेतकरी मॅट्रीक उत्तीर्ण आहेत. 6 टक्के शेतकरी महाविद्यालयापर्यंत पोहोचले. त्यानंतरही एकूण 83 टक्के शेतकर्‍यांचा शेती हाच व्यवसाय निर्धारित राहिला आहे.

या सर्व्हेक्षणातील सर्वात उल्लेखनीय व आनंददायी बाब म्हणजे सुमारे तीन चतुर्थांस शेतकर्‍यांना त्यांचा व्यवसाय आवडत असल्याचे या सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. तुम्हाला शेती आवडते का? या प्रश्नावर 72 टक्के म्हणजे बहुतांशी शेतकर्‍यांनी होय असे उत्तर दिले. कितीही अडचणी शेती कसण्यात येत असल्या तरी या काळ्या आईवर जीवापाड प्रेम करणारा हा पोशिंदा आहे.

छत टपकती है…
उसके कच्चे घर की!
फिर भी वो किसान…
करता है दुवा बारिश की !

…. अशा दिलदार मनाचा हा आमचा शेतकरी आहे. त्याला कर्जमुक्तीपेक्षाही गरज आहे ती शेतीसाठी लागणार्‍या संसाधनांची… तेवढे उपकार जरी मायबाप सरकारने केले तरी आमच्या बळीराजाला कुणापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही. पण हे लक्षात कोण घेतो? अशी अवस्था असल्यानेच शेतकरी अनास्थेत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या