Friday, April 26, 2024
HomeUncategorizedकीटकनाशके आणि प्रस्तावित कायदा

कीटकनाशके आणि प्रस्तावित कायदा

धोकादायक आणि बनावट कीटकनाशकांच्या उत्पादन आणि विक्रीवर अंकुश लावण्यासाठी नवीन कायदा प्रस्तावित आहे. सुमारे 12 वर्षे माहिती गोळा करून हे विधेयक तयार करण्यात आले असून संसदेच्या पटलावर लवकरच ते मांडले जाईल.

अ‍ॅड.प्रदीप उमाप

- Advertisement -

कालौघात रासायनिक शेतीचे दुष्परिणाम दिसू लागल्यामुळे आता सेंद्रीय, जैविक, नैसर्गिक शेतीचे नारे दिले जात आहेत. एकीकडे भरमसाठ उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जात असल्यामुळे जमिनींची सुपीकता धोक्यात आली आहे, तर दुसरीकडे अत्यंत विषारी कीटकनशाकांच्या वापरामुळे पिकांचे निरनिराळ्या किडींपासून, रोगांपासून संरक्षण होत असले तरी त्यातून जैवविविधता, जीवसृष्टी धोक्यात येते की काय, अशी भीतीही निर्माण झाली आहे. शेतात सातत्याने घातक कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे किडींवर जगणार्‍या पक्ष्यांची संख्या घटत चालली आहे. शेतातील कीटकांना खाणार्‍या काळ्या चिमण्या आणि चिमण्यांच्या इतर प्रजातींवरही कीटकनाशकांचा मोठा दुष्परिणाम झाला आहे. परिणामी आता हे पक्षी क्वचितच दृष्टीस पडतात. तिसरीकडे या कीटकनाशकांची फवारणी करताना काही शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

महाराष्ट्रात दुष्काळ आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमुळे चर्चेत असणार्‍या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2017 साली तब्बल 19 शेतकरी, शेतमजूर या विषारी कीटकनाशकांचे बळी ठरले. यानिमित्ताने भारतात विकल्या जाणार्‍या बनावट कीटकनशाकांचा मुद्दाही चर्चेत आला होता. अनेक कीटकनाशकांवर परदेशात बंदी घातलेली असताना ती भारतात राजरोसपणे विकली जात असून त्यावर बंदी घातली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक-2020 संसदेच्या पटलावर मांडण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अनुमती देण्यात आली असली तरी ते कृषी-रसायन क्षेत्रातील व्यावसायिकांची अपेक्षापूर्ती करणारे ठरेल का? हे विधायक तयार करण्यासाठी सुमारे 12 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लागला आहे आणि या प्रक्रियेत संसदेच्या स्थायी समितीसह अन्य स्रोतांमधून उपलब्ध झालेल्या माहितीचाही वापर करण्यात आला आहे. बनावट, कमी गुणवत्तेची किंवा प्रभावी नसणारी कीटकनाशके वापरल्यामुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान गतीने भरून काढण्यासाठी 50 हजार कोटींचा स्वतंत्र निधी उभा करण्याचा उल्लेख विधेयकात करण्यात आला आहे.

नियमभंग करणार्‍या कीटकनाशक कंपन्या तसेच केंद्र आणि राज्य सरकारांकडून या निधीत रक्कम जमा होणे अपेक्षित मानण्यात आले आहे. बंदी असलेल्या किंवा कमी गुणवत्तेच्या कीटकनाशकांचा पुरवठा केल्यास दंडाची रक्कम 50 लाख रुपये करण्याची व तीन ते पाच वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. सध्या दंडाची रक्कम अवघी दोन हजार रुपये असून तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. कीटकनाशकांचे उत्पादन, व्यापार आणि वापर या प्रक्रियांचे नियमन केंद्रीय कीटकनाशक मंडळाच्या सहाय्याने केले जाईल, असे विधेयकात म्हटले आहे. या मंडळात केंद्र, राज्य, शेतकरी यांच्या प्रतिनिधींबरोबर अन्य संबंधितांचेही प्रतिनिधी असतील. विधेयकातील अन्य उल्लेखनीय गोष्टींमध्ये पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल अशा सेंद्रीय कीटकनाशकांच्या उल्लेखाचा समावेश आहे. कीटकनाशकांच्या क्षेत्रात एका नियामकीय यंत्रणेची गरज प्रदीर्घ काळापासून व्यक्त करण्यात येत होती. कारण 1968 मधील जुना कीटकनाशक अधिनियम निरुपयोगी असल्याचे स्पष्ट झाले होते.देशभरात सुमारे तीनशेच्या आसपास कीटकनाशकांची उत्पादने आणि विक्रीसाठी नोंदणी करण्यात आली आहे. मात्र प्रचलित रसायनांची खरी संख्या त्याहून कितीतरी अधिक आहे. नोंदणी न करताही उत्पादन आणि विक्री केली जात असल्यामुळेच ही स्थिती उद्भवली आहे. नवा कायदा धोकादायक रसायनांच्या निर्मितीवर आणि विक्रीवर अंकुश लावण्यात प्रभावी ठरेल, अशी आशा आहे.

अर्थात, या प्रस्तावित कायद्यामुळे कीटकनाशक उद्योगातील काही कंपन्यांना शंका-कुशंकांनी घेरले आहे. ‘द क्रॉपलाईफ इंडिया’ या संशोधन आणि विकास कार्यक्रमाशी संलग्न असलेल्या 16 पीक विज्ञान कंपन्यांच्या संघटनेने हे विधेयक संसदेच्या प्रवर समितीकडे पाठवण्याची आणि या क्षेत्रातील सर्व संबंधितांशी नव्याने विचारविनिमय करण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. अशा घटनांमध्ये भारतीय दंडसंहिता 1973 लागू करणे बंद करावे आणि शेतीसाठीच्या कच्च्या मालाच्या उत्पादनाचे गुन्हेगारीकरण करू नये, अशीही या संघटनेची मागणी आहे. अशा तरतुदींमुळे गुंतवणुकीच्या पातळीवर नकारात्मक वातावरण निर्माण होते, असा युक्तिवाद त्यासाठी करण्यात आला आहे. विधेयक मंजुरीसाठी पाठवण्यापूर्वी सार्वजनिक सल्लामसलतीच्या माध्यमातून अनेक दोष सुधारता येऊ शकतात. विधेयकासंदर्भात जी मर्यादित माहिती समोर आली आहे त्यानुसार कृषी उत्पादनांमध्ये कीटकनाशकांच्या अंशाचे प्रमाण तपासण्याचा मुद्दा समाविष्ट आहे. विधेयकात केवळ नुकसानकारक कीटकनाशकांचाच उल्लेख असता कामा नये तर शेतकर्‍यांना या कीटकनाशकांचा उपयोग सावधगिरीने करण्यासाठी त्यांचे प्रबोधन करण्याचाही उल्लेख असायला हवा, जेणेकरून वापरानंतर शेतांमध्ये या कीटकनाशकांचे अंश मागे उरणार नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या